Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Paid Blue Tick for Instagram and Facebook: इन्स्टाग्राम आणि फेसबुकच्या व्हेरिफिकेशनसाठी पैसे मोजावे लागणार

Meta

Instagram and Facebook Update: ट्विटरनंतर आता फेसबुक आणि इंस्टाग्रामही ब्लू टिक व्हेरिफिकेशनसाठी पैसे आकारणार आहेत. मेटाचे (Meta) संस्थापक मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी रविवारी रात्री उशिरा फेसबुक पोस्टवरून सबस्क्रिप्शन सेवा (Subscription Service) सुरू झाल्याची माहिती दिली.

Meta Launching Paid Verification System: फेसबुक आणि इंस्टाग्रामही ब्लू टिक व्हेरिफिकेशनसाठी पैसे आकारणारले जाण्याची घोषणा काल रात्री करण्यात आली आहे. ट्विटरने असाच निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. आता या पेड सबस्क्रिप्शन स्पर्धेत फेसबुक आणि इंस्टाग्रामही उतरले आहे. 

मेटाचे (Meta) संस्थापक मार्क झुकरबर्गने यांनी फेसबुकवर लिहिले की, 'या आठवड्यात आम्ही मेटा व्हेरिफाईड सेवा सुरू करत आहोत. ही सदस्यता सेवा आहे. यामध्ये तुम्हाला सरकारी ओळखपत्राद्वारे ‘ब्लू टिक’ मिळेल आणि तुमच्या खात्याची पडताळणी करता येईल. त्याचसोबत खात्याला अतिरिक्त संरक्षण मिळू शकेल. ही नवीन सेवा सत्यता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी आहे. अलीकडेच मेटाने आपल्या फेसबुक वापरकर्त्यांना (Facebook Users)  डेटा चोरीचा इशारा दिला होता. Meta ने अहवाल दिला होता की Android आणि iOS वरील अनेक अॅप्सनी त्यांची लॉगिन क्रेडेन्शियल्स (Login Credentials) चोरली आहेत आणि त्यांचा गैरवापर केला जात आहे. सुमारे 10 लाख फेसबुक युजर्सचे लॉगिन क्रेडेन्शियल्स चोरीला गेल्याचे प्रकरण समोर आले होते. या पार्श्वभूमीवर आता मेटाकडून ही बातमी आली आहे.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधून सुरुवात

झुकरबर्ग म्हणाले आहेत की, 'आम्ही या आठवड्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये ही सेवा सुरू करू. यानंतर, लवकरच ते इतर देशांमध्ये देखील सदर सेवा आणली जाईल. यासाठी, वापरकर्त्याला वेबसाठी दरमहा $11.99 म्हणजेच सुमारे 1000 रुपये आणि iOS वापरकर्त्यांसाठी $14.99 म्हणजेच 1,200 पेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील. ही सेवा भारतात कधी लागू होणार याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

काही दिवसांपूर्वी ट्विटरने देखील ब्लू टिक व्हेरिफिकेशनसाठी पैसे आकारणार असल्याची घोषणा केली होती. लवकरच भारतामध्ये ही सेवा सुरु केली जाणार आहे. ट्विटरचे सर्वेसर्वा एलन मस्क यांना 2023 च्या अखेरीपर्यंत Twitter आर्थिकदृष्ट्या मजबूत करायचे आहे. महसूल वाढवण्यासाठी त्यांनी ब्लू सबस्क्रिप्शनसारख्या काही सेवांमध्येही बदल केले आहेत. भारतातील वेब वापरकर्त्यांसाठी या सेवेची मासिक सदस्यता 650 रुपये इतकी असणार आहे असे बोलले जात आहे. यापूर्वी राजकारणी, प्रसिद्ध व्यक्ती, पत्रकार आणि इतर सार्वजनिक व्यक्तींच्या सत्यापित खात्यांसाठी ‘ब्लू टिक’  मार्क विनामूल्य होता. आता कोणताही वापरकर्ता ही सुविधा मोफत घेऊ शकणार नाहीये. दुसरीकडे, 18 फेब्रुवारी रोजी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) पद्धतीबाबत नवीन घोषणा करण्यात आली. कंपनीने ट्विट केले आहे की, "20 मार्चपासून फक्त ट्विटर ब्लूचे सदस्य त्यांच्या टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) पद्धती म्हणून मजकूर संदेश वापरू शकतील."

पेड सबस्क्रिप्शनचा काय होईल फायदा?

सबस्क्रिप्शन घेणारे वापरकर्ते त्यांचे प्रोफाईल सरकारी आयडीने (Government ID) सत्यापित (Verify) करू शकतील. प्रोफाईल पडताळणीसोबतच, Facebook आणि Instagram चे सदस्यत्व देखील वापरकर्त्यांना फसवणुकीपासून अतिरिक्त संरक्षण प्रदान करेल.तसेच खात्यातील महत्वपूर्ण माहितीचे, खाजगी माहितीचे संरक्षण कंपनीतर्फे केले जाणार आहे. काही दिवसांपासून प्रसिध्द व्यक्तींच्या नावे बनावट खाती तयार करून लोकांकडून पैशाची मागणी केली जात असल्याचे प्रकरणे समोर आली होती. अशा पद्धतीच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी ही सुविधा आणली गेली आहे असे जाणकारांचे म्हणणे आहे. परंतु यातून कंपनीला महसूल देखील मोठ्या प्रमाणात मिळणार आहे हे नक्की.

लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसांपासून या नवीन सेवेची चर्चा सुरू होती,मात्र, आतापर्यंत Meta ने या सेवेबद्दल सविस्तर माहिती दिलेली नाही. TechDroider ने दावा केला आहे की मेटा व्हेरिफाईड फक्त ब्लू टिकिंग प्रोफाइलसाठी उपलब्ध असेल आणि पेजेससाठी नाही. अजूनपर्यंत मेटाकडून याबाबत ठोस आणि अधिकृत प्रक्रिया सांगण्यात आलेली नाही,प्रत्येकजण मेटाच्या पुढील हालचालीची वाट पाहत आहे. सोशल मिडीयावर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. पैसे देऊन सेवा घेण्याच्या या [निर्णयाला अनेकांनी विरोध देखील दर्शवला आहे.सोबत या निर्णयाची खिल्ली देखील उडवली जात आहे. सोशल मिडीयावर याविषयी मिम्सला उधाण आलेले पाहायला मिळते आहे. 

भारतात या सेवेचा किती लोक फायदा घेतात हे जाणून घेणे महत्वाचे ठरेल. येत्या सहा महिन्यात भारतात देखील सबस्क्रिप्शन सेवा (Subscription Service) सुरु केली जाईल असा अंदाज आहे.