वाढत्या महागाईची झळ फक्त भारतालाच नाहीतर संपूर्ण जगाला बसत आहे. नोमुरा होल्डिंग इंकच्या (Nomura Holdings Inc) अहवालानुसार आशिया खंडातील सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि फिलिपाईन्स या देशात अन्नधान्याच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर आशिया-पूर्व जपानमधील खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्या आहेत. डिसेंबरमध्ये 2.7 टक्यावरून ही महागाई मे महिन्यात 5.9 टक्के इतकी वाढली आहे. तसेच हा दर वर्षाअखेरपर्यंत आणखी वाढण्याची शक्यता अहवालात वर्तवण्यात आली आहे.
महागाई का वाढली
चीनमधील कोरोना महामारीमुळे (Covid -19 Pandemic) सततच्या लॉकडाऊन, थायलंडमधील स्वाईन फिव्हरचा (Swine Flu Pandemic) उद्रेक आणि भारतातील उष्णतेची लाट यासारख्या समस्यांमुळे अन्नधान्याच्या किमतीत वाढ (Food Prices increase) झाली आहे. तसेच खाद्यपदार्थांची मागणी सतत वाढत असल्याने महागाई (Inflation) आणखी वाढेल, अशी शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली आहे.
तृणधान्य, खाद्यतेल यासोबतच मांस, प्रक्रिया केलेले अन्न यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. तसेच घरभाडे किंवा राहण्याचा खर्च वाढल्याने जकार्ता आणि मनीला या शहरातील कर्मचाऱ्यांची किमान वेतन पातळीही वाढवल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे.
हा महागाईचा दर आताच्या 4.1 टक्क्यावरून दुसऱ्या सहामाहीत 8.2 टक्क्यापर्यंत दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. तसेच 'नोमुरा'ने दिलेल्या अंदाजानुसार, फीडस्टॉकच्या वाढत्या किमतीमुळे भारतात महागाई दर सर्वाधिक 9.1 टक्के होण्याची शक्यता वर्तवली आहे. या वाढत्या महागाईची झळ सर्वसामान्यांना बसणार आहे.