चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर चीनपेक्षा जास्त असेल असे चित्र आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला असून, कोरोना नंतर अनेक परदेशी कंपन्यांनी चीन ऐवजी भारताला पसंती दिली आहे. याचाच परिणाम म्हणून येत्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 6.4 टक्के दराने वाढेल, तर चीनचा जीडीपी वाढीचा दर 5 टक्के असू शकतो, असा अंदाज आहे. 2024-25 मध्ये भारत आणि चीनचा विकास दर अनुक्रमे 6.7 टक्के आणि 4.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे.
2022-23 मध्ये आर्थिक विकास दर 7.2%
आशियाई विकास बँकेने (Asian Development Bank) ग्रामीण आणि शहरी ग्राहकांची मागणी, ग्राहकांची खरेदी करण्याची क्षमता, शहरी बेरोजगारी आणि वाहनविक्रीत भारताची सुरु असलेली घोडदौड लक्षात घेता, यंदाच्या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 6.4% असेल असे म्हटले आहे.
Asian Development Bank (ADB) retains India's growth forecast at 6.4 pc for current fiscal, 6.7 pc in 2024-25
— Press Trust of India (@PTI_News) July 19, 2023
विविध संस्थांच्या आकडेवारीनुसार गेल्या काही वर्षात आशियातील देशांमध्ये परदेशी गुंतवणूकदार गुंतवणुकीस प्राधान्य देताना दिसत आहेत. मुबलक जागा, कुशल कामगार, दळणवळणाची साधने, आधुनिक तंत्रज्ञान या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी, भारतात उपलब्ध असल्यामुळे गुंतवणूकदारांनी भारताला पसंती दर्शवली आहे.
ADB नुसार, आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील विकसनशील अर्थव्यवस्था 2023-24 मध्ये 4.8 टक्के दराने वाढण्याची अपेक्षा आहे. 2024-25 मध्ये आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील विकास दर 4.8 टक्क्यांवरून 4.7 टक्क्यांपर्यंत खाली येईल, असे निरीक्षण देखील नोंदवले गेले आहे.
कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे ADB ने चालू आर्थिक वर्षासाठी किरकोळ महागाईचा अंदाजे 4.9 टक्के असेल असे म्हटले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेट वाढवल्यामुळे आणि त्याद्वारे व्याजदरात वाढ केल्यामुळे महागाई नियंत्रणात आली असल्याचे देखील या अहवालात म्हटले आहे.