भारतीय अर्थव्यवस्थेची सुदृढता दर्शवणारी एक बातमी आलीये. ही बातमी आहे भारताच्या परकीय गंगाजळीबाबत. RBI ने दिलेल्या माहितीनुसार भारताच्या फॉरेक्स रिझर्व्हने (Forex Reserve) पुन्हा एकदा 600 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या 15 महिन्यांतील हा उच्चांक आहे असे देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहेत. RBI ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 14 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा 12.74 अब्ज डॉलर्सने वाढून 609.02 अब्ज डॉलर्स इतका झाला आहे. गेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा 596.28 अब्ज डॉलर्स इतका होता.
फॉरेक्स रिझर्व्ह महत्वाचा का?
जागतिक बाजारपेठेत डॉलर या चलनात व्यवहार केले जातात. ज्या देशाकडे डॉलरचा साठा अधिक त्या देशाची आर्थिक परिस्थिती चांगली आहे असे समजले जाते. आणीबाणीच्या काळात संबंधित सरकारे त्यांच्याकडे असलेल्या फॉरेक्स रिझर्व्ह फंडचा उपयोग करत असते. भारताच्या परकीय गंगाजळीत दिवसेंदिवस होत असलेली वाढ ही सकारात्मक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मुख्य म्हणजे पाकिस्तानच्या तुलनेत भारताचा परकीय चलनाचा साठा 70 पट अधिक आहे. सध्या पाकिस्तान आर्थिक कंगालीचा सामना करत आहे.
India Forex Reserves - $609.02 billion.
— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) July 21, 2023
Foreign Currency Assets - $540.16 billion.
(Week ended July 14, 2023)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सोन्याच्या साठ्यात 1.13 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. भारताचा सोन्याचा साठा आता 45.19 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे.
भारताच्या परकीय चलनाच्या साठ्याचा उच्चांक हा ऑक्टोबर 2021 मध्ये नोंदवण्यात आला होता. या महिन्यात भारताचा फॉरेक्स रिझर्व्ह 645 अब्ज डॉलर इतका नोंदवला गेला होता. त्यानंतर जागतिक पातळीवर घडलेल्या घडामोडी, रशिया-युक्रेन युद्ध आदींचा परिणाम जाणवू लागला आणि देशाची परकीय गंगाजळी 525 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली. आता मात्र यात वाढ होताना दिसते आहे.
सर्वाधिक परकीय चलनाचा साठा असलेले टॉप-5 देश
1- चीन - 3371 अब्ज डॉलर्स
2- जपान - 1,254 अब्ज डॉलर्स
3- स्वित्झर्लंड - 898 अब्ज डॉलर्स
4- भारत - 609 अब्ज डॉलर्स
5- रशिया - 594 अब्ज डॉलर्स