भारत आणि रशिया या दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत. दोन्ही देशांमध्ये शस्त्रास्त्रापासून पेट्रोलियमपर्यंत अनेक वस्तूंची आयात-निर्यात होते. आता दोन्ही देश पर्यटनावर देखील भर देताना दिसत आहे. लवकरच भारतीय पर्यटकांना रशियात व्हिसामुक्त प्रवेशाची सुविधा मिळण्याची शक्यता आहे. याबाबत दोन्ही देशांमध्ये उच्च स्तरावर लवकरच चर्चा सुरू होणार आहे. तुम्ही देखील फिरण्यासाठी रशियाला जाण्याचा विचार करत असाल तर यामुळे नक्कीच फायदा होऊ शकतो.
भारतीय पर्यटकांना रशियात मिळणार व्हिसामुक्त प्रवेश
दोन्ही देशांच्या नागरिकांना एकमेकांच्या देशात लवकरच व्हिसामुक्त प्रवेश दिला जाण्याची शक्यता आहे. यामुळे रशियाला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही देशांमध्ये यासंबंधीत द्विपक्षीय करारावर जून महिन्यात चर्चा सुरू होणार आहे. तसेच, या वर्षाखेर व्हिसामुक्त प्रवेशासंबंधीच्या करारावर हस्ताक्षर होऊ शकतात.
रशियाच्या एका मंत्र्याने या कराराबाबत माहिती दिली आहे. हा करार पूर्ण झाल्यानंतर दन्ही देशातील नागरिक व्हिसा-मुक्त प्रवेशाचा फायदा घेऊ शकतील. यामुळे भारतीय पर्यटकांना व्हिसा काढण्यासाठी येणाऱ्या अडथळ्याशिवाय रशियाचा प्रवास करता येईल. दोन्ही देशातील पर्यटकांची संख्या वाढवणे हा यामागचा उद्देश आहे.
व्हिसामुक्त प्रवेश म्हणजे काय?
पर्यटकांना कोणत्याही समस्येशिवाय इतर देशांमध्ये प्रवास करता यावा हा व्हिसामुक्त प्रवेशाचा हेतू असतो. व्हिसा-मुक्त प्रवेशाचा अर्थ इतर देशांच्या नागरिकांना केवळ पासपोर्टच्या आधारावर इतर देशांमध्ये प्रवेश मिळतो. अशावेळी सर्वसाधारणपणे इतर कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नसते. मात्र, व्हिसामुक्त प्रवेश असला तरीही त्या देशात जाताना पासपोर्टची वैधता, हॉटेल बुकिंग व इतर कागदपत्रे तपासली जातात.
काहीवेळी या नियमांतर्गत इतर देशात प्रवेश केल्यावरही व्हिसा काढावा लागतो. हे तुम्ही त्या देशात किती दिवस राहणार व कोणत्या कारणासाठी प्रवास करत आहात, त्यावर अवलंबून असते. अनेक देश भारतीय पर्यटकांना व्हिसामुक्त प्रवेश देतात. भारतीय नागरिक जवळपास 60 पेक्षा अधिक देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश करू शकतात. यामध्ये भुतान, नेपाळ, अर्जेंटिना, केनिया सारख्या देशांचा समावेश आहे.
रशियाला जाण्यासाठी असे तयार करा ट्रॅव्हल बजेट
भारतीय नागरिकांना लवकरच रशिया फिरण्यासाठी व्हिसामुक्त प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही देखील रशियाला जाण्याची योजना बनवू शकता. सर्वातआधी, तुम्हाला किती दिवस प्रवास करणार आहात व कोणकोणत्या ठिकाणांना भेटी देणार आहात हे ठरवावे लागेल. त्यानुसार विमानप्रवास व हॉटेल बुकिंग करण्याचा निर्णय घ्या.
रशियातील विविध ठिकाणांची माहिती जाणून घ्या. विमानाने प्रवास करण्यासाठीचा खर्च, राहणे व खाण्या-पिण्याचा खर्च, स्थानिक वाहतुकीचा खर्च विचारात घेऊन प्रवासाचे बजेट तयार करा. तुम्ही सर्व सोयीसुविधांसाठी ट्रॅव्हल एजन्सीचीही मदत घेऊ शकता. यामुळे कोणत्याही समस्येशिवाय प्रवास करता येईल.