चीननंतर भारताला अमेरिकेपासून जास्त धोका असल्याचे भारतीय समजत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. तसेच रशिया-युक्रेन युद्धाला व्लादिमार पुतीन यांच्यापेक्षा नाटो संघटना आणि अमेरिकाच जास्त जबाबदार असल्याचे सर्वेक्षणात भाग घेतलेल्या बहुसंख्य नागरिकांचे म्हणणे आहे. चीन हा भारताचा नंबर एकचा शत्रू असल्याचे भारतीयांचे म्हणणे आहे. मागील काही वर्षापासून सीमेवरील तणाव वाढला असून चीन आणि भारताचे संबंध बिघडल्यामुळे हे शत्रुत्व आणखी वाढले आहे.
चीन क्रमांक एकचा शत्रू
सर्वेक्षणामध्ये 1 हजार नागरिकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी 43% नागरिकांनी चीनपासून भारताला सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले आहे. अमेरिका स्थित ग्लोबल बिझनेस इंटेलिजन्स संस्थेने हा सर्व्हे केला आहे. भारताच्या सुरक्षेला अमेरिकेपासून धोका असल्याचे 22% नागरिकांनी म्हटले आहे. त्यांनी अमेरिकेला दुसऱ्या क्रमांचा शत्रू असल्याचे म्हटले आहे. भारताचा पारंपरिक शत्रू पाकिस्तानपेक्षाही जास्त धोका भारताला अमेरिकेकडून असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
अमेरिका-चीन वादात भारत अडकू शकतो
आशिया पॅसिफिक खंडामध्ये चीनचे अनेक देशांशी शत्रुत्व निर्माण झाले आहे. आशियाई देशांमध्ये भारत हा एकमेव देश आहे जो चीनपुढे झुकत नाही. चीनचा वाढता प्रभाव पाहता अमेरिकेनेही भारताशी मैत्री वाढवली आहे. चीनला कोंडीत पकडण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली जगभरातील देशांची आघाडी उभी राहत आहे. भविष्यात चीन अमेरिकेमध्ये शत्रुत्व वाढत राहिले तर भारत या दोन्ही देशांमध्ये अडकू शकतो, असे काही नागरिकांचे म्हणणे असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.
भारताने रशियाकडून तेल खरेदी करावं -
भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवावी असे सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्यांपैकी 60% नागरिकांचे म्हणणे आहे. तर शस्त्र खरेदी आणि पुरवठा करण्यासाठी भारताने रशियालाच प्राधान्य द्यावं, असं सहभागी नागरिकांपैकी 48% नागरिकांचं म्हणणं आहे. तर अमेरिकेवर शस्त्रांच्या गरजेसाठी भारताने अवलंबून राहावं, असं 44 टक्के नागरिकांचे म्हणणे आहे.