Cosmetic Sales In India: भारतीयांचा सौंदर्य प्रसाधनांवरील खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. खरेदीमध्ये महिलांचा वाटा सर्वाधिक आहे. मागील 6 महिन्यात महिला आणि पुरुषांनी 5 हजार कोटींची कॉस्मेटिक उत्पादने खरेदी केल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे. प्रमुख 10 शहरांमध्ये लिपस्टिक, नेलपॉलिश, आयलाइनर सह इतर वस्तूंची विक्री वाढली आहे.
ऑनलाइन विक्री वाढली
कॉस्मेटिक वस्तुंची ऑनलाइन खरेदी वाढत आहे. पूर्वी दुकानात जाऊन सौंदर्यप्रसाधने खरेदी करण्यावर भर होता. मात्र, आता ऑनलाइन ऑर्डर वाढत आहे. एकूण विक्रीपैकी 40% वस्तूंची विक्री ऑनलाइन पद्धतीने होत आहे. महिलांचा नोकरीतील वाटा जसा वाढत जाईल तसे कॉस्मेटिक वस्तुंची विक्री आणखी वाढेल, असे Kantar या मार्केटिंग एजन्सीने केलेल्या अहवालात म्हटले आहे.
ऑनलाइन तसेच ऑफलाइन वस्तू खरेदीमध्ये नोकरी करणाऱ्या महिला आघाडीवर आहेत. सौंदर्य प्रसाधनांच्या विक्रीत आशिया आधीच आघाडीवर आहे. दक्षिण कोरिया जगभरात सौंदर्याचे नवनवीन ट्रेंड आणत असतो. भारतात यंग जनरेशन वाढत असल्याने कॉस्मेटिक विक्री वाढत असल्याचे दिसून येत आहे.
सरासरी 1200 रुपये खर्च
मागील सहा महिन्यांत एका ग्राहकाने सरासरी 1214 रुपयांच्या कलरफूल कॉस्मेटिक्स वस्तू खरेदी केल्या. यामध्ये लिपस्टिकचा वाटा 38% आहे. त्यानंतर नेलपेंटची सर्वाधिक विक्री झाली. पारंपरिक काजळ आणि लिपस्टिक याव्यतिरिक्त सौंदर्यप्रसाधनांचा भारतातील वापर वाढला आहे. प्रायमर, आयशॅडो, कन्सिलर्सचा खपही वाढत आहे, असे Renee Cosmetics कंपनीचे मालक आशुतोष वलानी यांनी सांगितले.
सोशल मीडियावरील जाहिरातींचा ग्राहकांवर प्रभाव
बाजारात अनेक ब्रँड उपलब्ध आहेत. मात्र, ग्राहकांना त्यांच्या वापराबद्दल शिक्षित करणे हे आव्हानात्मक आहे. दुकानदार ग्राहकांना वस्तू खरेदी करताना मदत करतात. तसेच सोशल मीडियावरील जाहिराती पाहूनही सौंदर्यप्रसाधने खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. लिप बाम, प्रायमर खरेदीस तरुणी जास्त पसंती देतात तर लिपस्टिक आणि नेल पॉलिश खरेदी करणाऱ्या महिलांचे वय जास्त असल्याचे अहवालात म्हटले आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            