Work Visa France: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच फ्रान्सचा दौरा केला. या दौऱ्यात राफेल विमान खरेदी करार आणि UPI पेमेंट सिस्टिम फ्रान्समध्ये लाँच करण्यात आली. त्यासोबतच भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली. फ्रान्समध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना 5 वर्षांचा वर्क व्हिसा मिळणार आहे. त्यामुळे फ्रान्समध्ये शिक्षण पूर्ण करून तेथेच नोकरी करण्यासाठी अनेक वर्षांची संधी मिळेल.
तीन वर्षांनी मुदत वाढवली
फ्रान्समध्ये भारतीय समुदायासाठी आयोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदींनी या निर्णयाची माहिती दिली. उच्च शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणानंतर 5 वर्षांचा वर्क व्हिसा देण्याचा निर्णय फ्रान्स सरकारने घेतल्याचे पंतप्रधान म्हणाले. यापूर्वी उच्च शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना फक्त 2 वर्षांचा वर्क व्हिसा दिला जात होता. त्यात तीन वर्षांची वाढ करण्यात आली.
पोस्ट स्टडी व्हिसा म्हणजे काय?
परदेशात उच्च शिक्षण घेतल्यानंतर अनेक विद्यार्थी त्याच देशात किंवा शहरात नोकरी शोधण्यास पसंती देतात. शैक्षणिक कर्ज आणि इतर खर्च भागवण्यासाठी नोकरीला प्राधान्य देतात. काही विद्यार्थी कायमचे रहिवासी होण्यासाठीही प्रयत्न करतात. जो देश जास्त वर्षांचा वर्क व्हिसा देतो त्या देशात शिक्षणासाठी जाण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो.
पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर पगारी नोकरी करण्यासाठी विद्यार्थ्यांना 12 ते 24 महिन्यांचा व्हिसा फ्रान्स सरकारकडून मिळत होता. त्यानंतर कायमची नोकरी मिळाली नाही तर तो देश विद्यार्थ्यांना सोडावा लागतो. आता फ्रान्समध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मुदत 5 वर्ष करण्यात आली आहे.
दरवर्षी सुमारे 4 लाख विद्यार्थी फ्रान्समध्ये शिक्षणासाठी येतात
उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परदेशात जाण्यासाठी स्टुडंट व्हिसा गरजेचा असतो. मात्र, मागील काही दिवसांत व्हिसा मिळणाच्या प्रक्रियेत दिरंगाई होत आहे. युरोपसह अमेरिकेमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्यास व्हिसा मिळण्यामध्ये वेटिंग पिरियड आहे. व्हिसासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येत असल्यामुळे काऊंसलेट कार्यालयावर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने दिरंगाई होत आहे. फ्रान्समध्ये जगभरातून दरवर्षी 4 लाख विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात.