गेल्या काही महिन्यांपासून भारतातील रिअल इस्टेट मार्केट तेजीत असल्याचे पहायला मिळते आहे. याआधी अनेक मार्केट रिसर्च कंपन्यांनी याबाबतचे अहवाल सादर केले होते. आता मात्र स्वतः रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबत माहिती दिली आहे.
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार निवासी आणि व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्रातील बँक पत जुलैमध्ये वार्षिक आधारावर 38 टक्क्यांनी वाढली आहे. देशभरातील खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडे रिअल इस्टेट क्षेत्रातील एकूण बँक कर्जाची थकबाकी 28 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. याचाच अर्थ निवासी घरांसाठी खर्च घेणारे आणि व्यावसायिक संकुलाच्या खरेदीसाठी कर्ज घेणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसते आहे.
रिअल इस्टेट क्षेत्राला ‘अच्छे दिन’
कोविडनंतर भारतातील रिअल इस्टेट क्षेत्राचे कमालीचे नुकसान झाले होते. मात्र गेल्या दोन वर्षात या क्षेत्रात गुंतवणूकदारांची संख्या झपाट्याने वाढते आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.
निवासी घरांसाठी कर्ज घेण्यात 37.4 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवण्यात आली असून, जुलै महिनाअखेरीस निवासी घरांसाठीचे कर्ज 24.28 लाख कोटींपर्यंत पोहोचले आहे. कोविडनंतर अनेक पगारदार कर्मचाऱ्यांना स्वतःच्या घर असावे असे वाटू लागले आहे. वाढत्या महागाईच्या काळात गुंतवणूक म्हणून देखील रिअल इस्टेटमध्ये नागरिकांची पसंती दिसते आहे. तसेच RBI च्या गेल्या दोन पतधोरण बैठकींमध्ये रेपो रेट वाढण्यात आलेला नव्हता. या संधीचा फायदा घेत नागरिकांनी गृहकर्ज घेणे पसंत केल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
याशिवाय व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्रात खरेदी करण्यासाठी कर्ज घेणाऱ्यांच्या संख्येत वार्षिक 38.1 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. तसेच या क्षेत्रातील कर्जाची प्रकरणे 4.07 लाख कोटींपर्यंत पोहोचल्याचे आरबीआयने म्हटले आहे. गेल्या काही वर्षात मुंबई, बंगळूरू, दिल्ली, चेन्नई आदी शहरांतील स्टार्टअप्सला राज्य आणि केंद्र सरकारांचे चांगले प्रोत्साहन मिळते आहे. वाढत्या उद्योगधंद्यामुळे व्यावसायिक ऑफिस, संकुल, गोदामांची देखील खरेदी वाढली आहे.