डिसेंबर 2022 मध्ये रशियाकडून (Russia) भारताला (India) होणारा कच्च्या तेलाचा (Crude Oil) पुरवठा विक्रमी 9,09,403 बॅरलवर पोहोचला आहे. याचाच अर्थ आपण सरासरी दिवसाला 1.09 लाख बॅरल इतकं तेल दररोज रशियाकडून आयात केलं आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातही रशियाकडून आपली इंधन आयात 9 लाख बॅरलहून जास्तच राहिली आहे. ऊर्जा कार्गो ट्रॅकर कंपनी व्हर्टेक्सोनं (Vertexo) हे आकडे प्रसिद्ध केले आहेत.
यापूर्वी जून 2022 मध्ये आपण रशियाकडून 9,42,694 बॅरल इतकं कच्चं तेल आयात केलं होतं. भारत हा जगातला तिसरा मोठा कच्चं तेल आयातदार देश आहे. कारण, देशातल्या 85% इंधनासाठी आपण बाहेरच्या देशांवर अवलंबून आहोत. कच्च्या तेलावर प्रक्रिया करूनच पेट्रोल, डिझेल सारखी इंधनं तयार केली जातात. आपल्या एकूण गरजेपैकी 25% इंधन आपण रशियाकडून सध्या आयात करत आहोत.
रशियाने युक्रेन देशावर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेनं तिथून तेल खरेदी करण्यावर निर्बंध घातले आहेत. तसंच रशियातून आयात होणाऱ्या तेलाच्या किमतीवरही मर्यादा घातली आहे. पण, यावर तोडगा म्हणून भारत आणि रशिया दरम्यानचे व्यवहार रशियन रुबेल्स या चलनात होत आहेत. आणि त्यामुळे भारताला रशियातून स्वस्तात तेल पुरवठा होत आहे. अमेरिकेनं अर्थातच, रशियाकडून तेल विकत घेण्याच्या निर्णयाचा निषेध केला आहे. पण, परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी संसदेत वारंवार ‘जिथून स्वस्त तेल मिळणार, ते आम्ही घेऊ,’ ही भारताची भूमिका स्पष्ट केली आहे.
भारत सर्वाधिक तेल कुठून आयात करतो?
भारत कुठल्या देशातून सर्वाधिक तेल आयात करतो हे देखील व्हर्टेक्साच्या अहवालातून स्पष्ट होऊ शकतं. रशिया खालोखाल आपण इराण, सौदी अरेबिया यांच्याकडून तेल विकत घेतलं आहे. डिसेंबर महिन्याची आकडेवारी बघितली तर भारताने 8,03,228 बॅरल इतकं कच्चं तेल इराणकडून विकत घेतलं आहे. तर त्या खालोखाल सौदी अरेबियाकडून 7,18,357 बॅरल तेल विकत घेतलं आहे. तिसऱ्या क्रमांकावर संयुक्त अरब अमिराती या देशाचा नंबर लागतो. नोव्हेंबर महिन्यात आपण UAE पेक्षा अमेरिकेकडून जास्त तेल आयात केलं होतं.
रशिया - युक्रेन युद्धापूर्वी भारत 60% तेल मध्य भारतातून आयात करत असे. तर 14% तेल उत्तर अमेरिकेतून आणि आफ्रिकन देशांतून 12% तेल आयात व्हायचं. भारतीय आयातीतला रशियाचा वाटा फक्त 2% इतका होता. पण, जून 2022 पासून हा हिस्सा वाढून सर्वाधिक म्हणजे 25% झाला आहे.
रशियाकडून तेल आयात करण्याविषयी जयशंकर राज्यसभेत म्हणाले होती की, ‘आम्ही तेल कंपन्यांना रशियाकडून तेल घ्या असं सांगत नाही. जिथून स्वस्त मिळेल, तिथून घ्या असं आम्ही सांगतो.’ सध्या अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियन तेलावर 60 डॉलर प्रती बॅरलची दर मर्यादा लावली आहे. भारत या मर्यादेच्या पलीकडे रशियाबरोबर रुबेल्स किंवा रुपयात व्यवहार करत आहे.