भारतीय शेअर बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशी घसरण दिसून आली आहे. सेन्सेक्स (Sensex) निर्देशांक 60,000 च्या खाली आला आहे. तर निफ्टी (Nifty) निर्देशांक 18,750 च्या खाली आहे. आणि या पडझडी मागे एक कारण बँका (Banking Sector), माहिती-तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातल्या शेअरच्या घसरणी बरोबरच तेल कंपन्यांमध्ये (Oil Company) झालेली घसरण हे ही आहे.
सोमवारपासून इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC), हिंदुस्तार पेट्रोलियम (HPCL), ऑईल इंडिया (India Oil) अशा तेल कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. सलग तीन सेशनमध्ये ही घसरण थांबलेली नाही. गुरुवारी (12 जानेवारी) तेल आणि नैसर्गिक वायू निर्देशांकही 0.85% नी खाली येत 8,460 वर स्थिरावला. यामध्ये सगळ्यात मोठी घसरण इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांच्या शेअरमध्ये झाली.
तेल कंपन्यांच्या घसरणीची कारणं
यातली बरीचशी कारणं आंतरराष्ट्रीय आहेत. भारत गरजेच्या 80% तेल किंवा इंधन बाहेरून आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या किमतीप्रमाणे भारतीय तेल कंपन्यांवरही परिणाम होत असतो.
सध्या चीनच्या आंतरराष्ट्रीय सीमा उघडल्यामुळे तिथून तेलाची मागणी वाढली आहे. पण, त्याचबरोबर कोव्हिडच्या प्रसाराची भीतीही वातावरणात आहे. कच्च्या तेलाचे व्यवहार फ्युचर म्हणजे वायदे बाजारात होतात. आणि तिथे सोमवारपासून कच्च्या तेलाच्या किमती घसरतायत. याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावरही जाणवतोय.