पेट्रोलिय कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केलेला नाही. 21 मे 2022 नंतर देशभरात इंधन दर स्थिर आहेत. याच काळात जागतिक कमॉडिटी बाजारात क्रूडचा भाव तब्बल 46 डॉलरने कमी झाला आहे. मात्र कंपन्यांनी दर कपातीबाबत हात आखडता घेतल्याने ग्राहकांना महाग इंधन खरेदी करावे लागत आहे. मागील वर्षभरात भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या सरकारी तेल वितरक कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल विक्रीतून भक्कम नफा कमावला आहे. (OMC Making Profit On Petrol and Diesel sale)
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु झाले होते. त्यावेळी जगभरातील प्रमुख कमॉडिटींच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती. क्रूड ऑइलचा भाव तेव्हा 139 डॉलर प्रती बॅरल इतका वाढला होता. तेव्हाही पेट्रोलियम कंपन्यांनी तेलाची खरेदी सुरुच ठेवली होती. भारतात कच्च्या तेलाच्या एकूण मागणीच्या जवळपास 80% तेल आयात केले जाते.
पेट्रोलियम कंपन्यांनी सरासरी 120 डॉलरच्या दराने तेल खरेदी केले होते. त्यात होणाऱ्या नुकसानीची भरपाई आता केली जात असल्याचे बोलले जाते. भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या तीन सरकारी तेल कंपन्यांनी 6 एप्रिल 2022 रोजी शेवटचा दर बदल केला होता. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर ठेवले आहेत. एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 या काळात जागतिक कमॉडिटी बाजारात क्रूडचा भाव 102.97 डॉलरवरुन 78.09 डॉलर या दरम्यान राहिला. जून 2022 मध्ये तो 102.97 डॉलर इतका होता.
कच्च्या तेलातील चढ उतारांचा फायदा पेट्रोलियम कंपन्यांना झाला आहे. आजच्या घडीला एक लिटर पेट्रोलवर कंपन्यांना 10 रुपयांचा निव्वळ नफा मिळवत आहेत. डिझेलच्या किरकोळ विक्रीतून कंपन्यांना प्रती लिटर 6.5 रुपयांचा नफा मिळत असल्याची माहिती समोर आली आहे.
आयसीआयसीआय सिक्युरिटीज या ब्रोकिंग कंपनीच्या अहवालानुसार पेट्रोलियम कंपन्यांना 24 जून 2022 च्या आठवड्यात पेट्रोल विक्रीवर प्रती लिटर 17.4 रुपये आणि डिझेल विक्रीवर 27.7 रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता. चालू आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाही तोटा कमी होऊन कंपन्यांना पेट्रोल विक्रीवर प्रती लिटर 10 रुपये आणि डिझेल विक्रीवर प्रति लिटर 6.5 नफा मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या तीन कंपन्यांना एकत्रित 21201.18 कोटींचा तोटा झाला होता.
सहा महिन्यात क्रूडचा दर 40% घसरला
मागील वर्षभरात जागतिक कमॉडिटी बाजारात क्रूड ऑईलचा भाव जवळपास 40% ने कमी झाला आहे. सहा महिन्यांपूर्वी भारतातील पेट्रोलियम कंपन्यांनी 116.01 डॉलर प्रती बॅरल या दराने कच्चे तेल खरेदी केले होते. डिसेंबर 2022 मध्ये क्रूडचा भाव 70.11 डॉलर इतका खाली आला. त्यात सहा महिन्यांत 40% घसरण झाल्याचे दिसून आले.