India-made Cough Syrup: मागील वर्षी गांबिया, उझबेकिस्तानसह इतर काही देशांतील लहान बालकांचा मृत्यू भारतीय कफ सिरपचे सेवन केल्यामुळे झाला असा आरोप करण्यात आला होता. जागतिक आरोग्य संघटनेने देखील या प्रकरणी चौकशी केली होती. दरम्यान, या प्रकरणी गांबिया देश आता भारताविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
फार्मसी ऑफ द वर्ल्ड
भारताला फार्मसी ऑफ द वर्ल्ड असे म्हटले जाते. मात्र, काही कंपन्यांनी दूषित आणि बनावट औषधे परदेशात निर्यात केल्याचे भारतीय आरोग्य यंत्रणांच्याही तपासात उघड झाले होते. या घटनेनंतर भारताची प्रतिमा मलिन झाली. आफ्रिकेतील गरीब देशांसह इतरही अनेक देशांना भारत औषधे निर्यात करतो. बालकांच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशातील काही फार्मा कंपन्यांना या घटनेनंतर टाळे लावण्यात आले. शरीराला घातक पदार्थांचे औषधात जास्त प्रमाण, नियमांचे पालन न करणे, दूषितपणा अशा काही त्रुटी आढळून आल्या होत्या.
गांबियाकडून होणार कायदेशीर कारवाई
परदेशातील 70 मुलांचा भारतीय बालकांचा कफ सिरपचे सेवन केल्यामुळे मृत्यू झाला होता. त्यामध्ये गांबिया देशातील बालकांचाही समावेश होता. किडनी फेल झाल्यामुळे बालकांचा मृत्यू झाला होता. कफ सिरपच्या सेवनामुळे मुलांना त्रास झाल्याचे गांबियातील आरोग्य यंत्रणांनी म्हटले आहे.
कोणाविरुद्ध होणार कारवाई
अटलांटिक फार्मा, मेडेन फार्मासह इतर काही फार्मा कंपन्या आणि भारत सरकारला गांबिया आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार आहे. भारताविरोधात कारवाई करण्यासाठी काय कायदेशीर पर्याय आहेत ते पडताळून पाहिले जात आहे. जर भारताविरोधातील आरोप सिद्ध झाले तर भारताला मोठी नुकसान भरपाई द्यावी लागू शकते. बळी पडलेल्या बालकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी लागू शकते. तसेच दंडही होऊ शकतो.