Windfall Tax: केंद्र सरकारने पेट्रोलियम पदार्थांवरील कररचनेत बदल केला आहे. देशांतर्गत तयार होणाऱ्या पेट्रोलियम क्रूड ऑइलवरील विंडफॉल टॅक्स प्रति टन 6,700 रुपयांवरून 10 हजार करण्यात आला आहे. पेट्रोलियम कंपन्यांना बाजारातील चढउतारांमुळे अचानक नफ्यात वाढ झाल्यानंतर विंडफॉल कर वाढवला जातो.
जेट फ्युअलवरील कर कमी
दरम्यान, डिझेल निर्यातीवर कर 6 रुपये प्रती लिटरवरून 5.50 रुपये करण्यात आला आहे. तर एव्हिएशन टर्बाइन फ्युअलवरील कर (ATF) 4 रुपये प्रति लिटरवरून 3.50 केला आहे. नवे दर आजपासून (16 सप्टेंबर) पासून लागू होतील. पेट्रोलवरील करात कोणताही बदल करण्यात आला नाही.
यापूर्वी 2 सप्टेंबरला देशांतर्गत तयार होणाऱ्या क्रूड ऑइलवरील विंडफॉल टॅक्स 7,100 रुपये वरून 6,700 करण्यात आला होता. तर मागील वर्षी जुलै महिन्यात डिझेलच्या निर्यातीवर 13 प्रती लिटर निर्यात कर लागू लावला होता. ATF आणि पेट्रोलवर 6 रुपये प्रति लिटर निर्यात कर लागू केला होता. तेलाच्या जागतिक स्तरावरील किंमती विचारात घेऊन करात बदल करण्यात येतात.
ऑगस्ट महिन्यात इंधनाची मागणी वाढली
ऑगस्ट महिन्यात देशातील पेट्रोल आणि डिझेलचा वापर 3% आणि 5 टक्क्यांनी वाढला. वाहनांची संख्या आणि आर्थिक उलाढाल वाढल्याने इंधनाचा वापर वाढला. तर जेट फ्युअलची विक्री मागील वर्षीच्या तुलनेत 14 टक्क्यांनी वाढली. LPG चा वापर 3 टक्क्यांनी वाढला. भारतामध्ये तेलाची जी एकूण मागणी आहे त्यात डिझेलचा वाटा 40% आहे. वाहतूक, खाणकाम आणि शेतीच्या कामांसाठी डिझेलचा सर्वाधिक वापर होतो.
रशिया युक्रेन युद्धानंतर भारताने रशियाकडून सर्वाधिक क्रू़ड ऑइल आयात करण्यास सुरूवात केली. कारण, इतर देशांपेक्षा स्वस्तात इंधन पुरवठा केला जात होता. मात्र, आता रशियाने दरवाढ केली आहे. त्यामुळे जूनपासून कच्च्या तेलाची रशियाकडून होणारी आयात रोडावली आहे.