भारत आणि चीन (India - China Faceoff) दरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) मागची दोन वर्षं तणाव वाढलाय. 2020 मध्ये गलवान (Galwan Valley) खोऱ्यात दोन सैन्यांमध्ये झालेल्या झटापटीत भारताने आपले वीसच्या वर सैनिकही गमावले होते. त्यानंतर अधून मधून चीनने सीमेवर आगळीक केल्याचे आरोप भारताने केले आहेत. अगदी अलीकडे ताजं प्रकरण घडलं ते अरुणाचल प्रदेशमध्ये (Arunachal Pradesh). इथं तर दोन्ही बाजूचं सैन्य आणि सामान्य नागरिकांमध्येही बाचाबाची झाली होती.
त्यानंतर आता चीनकडून याविषयी त्यांची अधिकृत भूमिका मांडण्यात आली आहे. चीनचे परराष्ट्रव्यवहारमंत्री वाँग यी (Wang Yi) यांनी रविवारी बीजिंगमध्ये ‘आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि चीनचे आंतरराष्ट्रीय संबंध’ या विषयावर एका परिषदेत भाग घेतला. यावेळी बोलताना भारताबरोबरचे संबंध चांगले आणि स्थिर राहावेत यासाठी चीनचा प्रयत्न आहे ही भूमिका मांडली.
‘आम्ही राजनैतिक आणि सैन्यदलाच्या पातळीवर चर्चा सुरू ठेवली आहे. आणि दोन्ही देशांमधले संंबंध सुधारावेत हाच त्यामागचा हेतू आहे,’ असं वाँग या परिषदेत बोलताना म्हणाले. यिन यांचा समावेश चीनमधल्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या पोलिटिकल ब्युरोमध्ये अलीकडेच झाला आहे. त्यामुळे ते चीनमधले एक महत्त्वाचे नेते आहेत.
सीमेवर शांतता राहिली पाहिजे, हाच दोन्ही देशांचा हेतू आहे, असं वाँग यांनी बोलून दाखवलं. चीनकडून वाँग यिन आणि भारताकडून अजित दोवाल हे दोन देशांमध्ये सीमेवर शांतता राहावी यासाठी चर्चा करत असलेल्या प्रतिनिधी मंडळाचे महत्त्वाचे घटक आहेत.
रविवारच्या परिषदेत वाँग यांनी भारत, रशिया आणि अमेरिकेबरोबरच्या संबंधांवर विस्ताराने भाष्य केलं. आणि चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यावर त्यांनी भर दिला. याच महिन्यात 20 डिसेंबरला भारत आणि चीन दरम्यान कमांडर पातळीवर द्विपक्षीय चर्चा पार पडली. आणि या बैठकीतही चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यावर दोन्ही बाजूने सहमती झाली.
आतापर्यंत दोन देशांमध्ये सीमेवरचा वाद सोडवण्यावरून चर्चेच्या 17 फेऱ्या पार पडल्या आहेत.
पण, दुर्दैवाने सीमेवर होणाऱ्या झटापटी पूर्णपणे थांबल्या नाहीएत. अलीकडे एका सॅटेलाईट इमेजमधून चीनने सीमेवर भारताच्या हद्दीत काही बांधकाम केल्याचंही स्पष्ट झालं होतं. आणि अरुणाचल प्रदेशाच्या सीमेवर चीनकडून चिनी गाव वसवण्याचा प्रयत्न असल्याचंही या सॅटेलाईट चित्रावरून दिसलं.
चीनची ही एक रणनिती मानली जाते. देशांच्या सीमांवर गावं वसवून नंतर चीनकडून तो भूभाग चीनचा असल्याचा दावा करण्यात येतो.