चीनच्या झिरो कोव्हिड धोरणामुळे (China Zero Covid Policy) तिथल्या काही प्रांतांमध्ये सततचं लॉकडाऊन (Coronavirus Lockdown) सुरू आहे. त्यामुळे वैतागलेल्या लोकांनी नोव्हेंबर 2022 पासून सरकारविरोधी आंदोलनंही सुरू केली. त्यानंतर तिथल्या कम्युनिस्ट सरकारने कोरोनाचे निर्बंध काही प्रमाणात शिथील केले आहेत. पण, भारतापुरतं बोलायचं झालं तर चीनमध्ये थांबलेल्या आर्थिक व्यवहारांचा फायदा भारताला करून घेता आला का हा मोठा प्रश्न आहे.
सेवा तसंच उत्पादन क्षेत्रात (Service & Manufacturing Sector) भारत आणि चीन यांची एकमेकांशी स्पर्धा असते. आणि चीनने जागतिक स्तरावर उभी केलेली तगडी पुरवठा साखळी भेदणं हे भारतासमोरचं मोठं आव्हान आहे. अशावेळी चीनमधली आताची परिस्थिती भारतासाठी पोषक ठरू शकते.
आणि काही अंशी भारताला याचा फायदा मिळालाही आहे. अॅपल कंपनीचे (Apple Inc.) फोन बनवण्याचं मोठं कंत्राट कंपनीने भारताबरोबरचा करार अर्धवट सोडून चीनला दिलं होतं. पण, आता बदललेल्या परिस्थितीत अॅपलचं उत्पादनही काही प्रमाणात भारतात करून घेण्याचं धोरण अॅपल कंपनीने ठेवलं आहे.
द वॉलस्ट्रीट जर्नलने दिलेल्या बातमीनुसार, अॅपल कंपनीने आपल्या मोबाईल फोन्सचं उत्पादन आणि जोडणी चीन ऐवजी इतर आशियाई देशांकडून करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. आणि यात भारत व व्हिएतनाम हे देश आघाडीवर आहेत.
दुसरीकडे, गुंतवणूक क्षेत्रातही परकीय गुंतवणूकदार संस्थांनी भारतीय शेअर बाजार, सराफा बाजार इथं चीनपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे . भारतीय बाजारात अलीकडे दिसलेली तेजी ही परकीय संस्थांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच आली आहे.
आकडेवारी सांगायची झाली तर राष्ट्रीय शेअर डिपॉझिटरी संस्थेच्या (NSDL) म्हणण्यानुसार, नोव्हेंबर महिन्यात परकीय गुंतवणूकदार संस्थांनी भारतात 36,239 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. हे प्रमाण ऑगस्ट 2022 (51,204 कोटी रु.) नंतरचं सर्वाधिक आहे.
आताही 2023 साली भारतीय शेअर बाजार 19%नी वधारतील असा अंदाज जागतिक संस्थांनी व्यक्त केला आहे. ही वाढ परकीय गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारपेठेवर असलेला विश्वास दर्शवते.