Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

India - China Trade : भारताने चीनबरोबरचे व्यापारी संबंध तोडू नयेत - अरविंद पानगरिया

Arvind Pangaria

Image Source : www.tribuneindia.com

भारताला आताच्या घडीला इतर देशांबरोबरचे आपले व्यापारी संबंध अधिक वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे चीनशी वैर पत्करण्यापेक्षा देशानं आपलं लक्ष युके आणि इतर युरोपीय देशांबरोबर मुक्त व्यापार करार करण्यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे असं निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगरिया यांनी म्हटलं आहे

चीनबरोबर (China) अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) इथं सीमेनजीक झालेल्या झटापटीनंतर देशात चीनबरोबर व्यापारी असहकार (Trade War) पुकारण्याची हाकाटी सुरू झाली आहे. पण, असं करण्याने भारताच्याच विकासाला अकारण खीळ बसेल, असं मत देशाच्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगरिया (Arvind Pangaria) यांनी व्यक्त केलं आहे.     

भारताने आता युके तसंच इतर युरोपीयन देशांबरोबर मुक्त व्यापार करार करण्यात पुढाकार घ्यावा असंही त्यांनी बोलून दाखवलं आहे.पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना पानगरिया यांनी देशाच्या आताच्या आर्थिक स्थितीविषयी आपली मतं मांडली. आर्थिक प्रगतीचा विचार करत असाल, तर चीनबरोबर आता व्यापारी युद्ध करणं योग्य ठरणार नाही. राजनयिक लढाई सुरूच राहील असं त्यांचं मत आहे.   

भारत आणि चीन सैन्यामध्ये 9 डिसेंबरला अरुणाचल प्रदेश जवळ हाणामारी झाली. भारतीय सैन्यदलाकडून याची माहिती देताना, ‘दोन्हीकडच्या सैनिकांना थोडीफार दुखापत झाली,’ असं स्पष्ट करण्यात आलं.    

यानंतर चीनला धडा शिकवण्यासाठी त्यांच्याबरोबरचे व्यापारी संबंध तोडले पाहिजेत असा विचार काही जणांनी देशात मांडला. तो खोडून काढण्यासाठी पानगरिया यांनी काही आकडेवारी दिली.    

‘भारत आणि चीन व्यापारी युद्ध पुकारू शकतात. पण, त्याचे परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार आहेत. भारताची अर्तव्यवस्था आकाराने 3 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतकी आहे. तर चीनची 17 ट्रिलिटन अमेरिकन डॉलरची. अशावेळी भारताकडून चीनला कितीसा अपाय होणार. आणि उलट भारतालाच या व्यापारी युद्धाची किती झळ बसणार याचा विचार झाला पाहिजे,’ असं पानगरिया म्हणाले.    

अमेरिकेसारखी मोठी अर्थव्यवस्थाही चीनबरोबर व्यापारी युद्ध करून चीनला फारसा मोठा धडा शिकवू शकली नाही. त्यामुळे भारतानेही आता तसा विचार करू नये, असं त्यांचं मत आहे.    

दोन देशांमधली व्यापारी तूट बघितली तर पानगरिया यांचं म्हणणं कळेल. एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान भारत आणि चीन दरम्यानच्या आयात आणि निर्यातीची तफावत 51.5 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती. म्हणजे भारताची निर्यात आयातीपेक्षा 51.5 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी कमी होती.    

आणि ही व्यापारी तूट गेल्या काही वर्षांमध्ये वाढतच गेली आहे. 2020-21 मध्ये ही व्यापारी तूट 40 अब्ज अमेरिकन डॉलरची होती. ती आता 70 अब्ज अमेरिकन डॉलरवर गेली आहे.    

पण, चीनबरोबरची व्यापारू तूट भरून काढण्यासाठीचा एक अप्रत्यक्ष उपाय म्हणजे चीन व्यवहार करत असलेल्या देशांबरोबर मुक्त व्यापार धोरणाचे करार करणं हा आहे, असं पानगरिया यांना वाटतं. अलीकडेच भारताने युकेबरोबर तशी बोलणी सुरू केली आहेत. मुक्त व्यापार धोरणाच्या करारांमुळे देशाचा त्या देशाबरोबर व्यापार वाढेल. आणि त्याचा फटका चीनला नक्की बसेल, असं मत पानगरिया यांनी व्यक्त केलं.   

अरविंद पानगरिया सध्या कोलंबिया विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.