पीएम केअर्स फंड आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे. 2020 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष निधीची सुरुवात केली गेली ज्याद्वारे गरजू नागरिकांना मदत करता येईल. 2020 साली जेव्हा संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या विळख्यात अडकले होते, त्यावर्षी पीएम केअर्स फंड सुरु करण्यात आला. या फंडात केवळ भारतीयच नाही तर देशोविदेशातील नागरिकांनी देखील त्यांचे योगदान दिले आहे. प्राप्त माहितीनुसार, गेल्या तीन वर्षात पीएम केअर्स फंडात देणगीच्या रुपात परदेशातून 535.44 कोटी रुपये जमा झाले आहेत.
कोरोना काळात सर्वात जास्त देणग्या
पीएम केअर्स फंडाबाबत दिलेल्या माहितीनुसार 2019-20 या आर्थिक वर्षात 0.40 कोटी रुपये रक्कम पीएम केअर्स फंडात जमा झाली होती. त्यानंतर पुन्हा जेव्हा भारतासह जगभरात कोरोनाचे थैमान सुरु झाले त्या आर्थिक वर्षात 2020-21 मध्ये 494.92 कोटी रुपये रक्कम फंडात जमा झाली होती. यानंतर जेव्हा पुन्हा कोरोनाचा जोर ओसरायला सुरुवात झाली तेव्हा 2021-22 मध्ये 40.12 कोटी रुपये इतकी रक्कम दान स्वरूपात पीएम केअर फंडात जमा झाली आहे.
विशेष म्हणजे कोरोनाचा कहर सुरु असताना सर्वात जास्त परदेशी नागरिकांच्या देणग्या पीएम केअर्स फंडात जमा झाल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचलेला असताना भारतातील आरोग्य व्यवस्थेसमोर मोठी आव्हाने उभी राहिली होती. ऑक्सिजनचा तुटवडा, आवश्यक त्या औषधांचा पुरवठा करण्यासाठी सरकारला अतिरिक्त निधीची गरज होती. पीएम केअर फंडाच्या माध्यमातून ही गरज पूर्ण करण्यात आली होती.
कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर 2021-22 मध्ये केवळ 40.12 कोटी रुपये फंडात जमा झाल्याचे निदर्शनास आले आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार,गेल्या तीन वर्षात पीएम केअर फंडामध्ये 24.84 कोटी रुपये परदेशी देणग्यांचे व्याज म्हणून जमा झाले आहेत.
पीएम केअर्स फंडासाठी दिलेले योगदान पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) प्रमाणेच मानले जाईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) हा 1948 साली तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्या पुढाकाराने सुरु झालेला निधी आहे. हा निधी आपत्कालीन परिस्थितीत केला जातो, तसेच सामाजिक कार्यासाठी देखील हा निधी देता येतो. पीएम केअर्स फंड (PM CARES Fund) हा केवळ कोविडशी निगडीत कामांसाठी वापरण्याचे प्रावधान आहे. पीएम केअर्स फंडाला दिलेल्या सर्व देणग्या आयकर कायदा, 1961 च्या कलम 80G अंतर्गत 100% कर सवलतीसाठी पात्र आहेत. यात देणगीदार कमीत कमी 10 रुपये देणगी म्हणून देऊ शकतात.
भारतीयांनी देखील केली भरभरून मदत!
ज्या पद्धतीने पीएम केअर्स फंडा परदेशी देणग्या मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या. त्याचप्रमाणे भारतीय नागरिकांनी देखील आव्हानात्मक काळात सरकारला मदत केली आहे. प्राप्त माहितीनुसार 2021 मध्ये 7183.77 कोटी रुपये तर 2021-22 मध्ये 1,896.76 कोटी रुपये रक्कम पीएम केअर्स फंडात जमा झाली आहे.
सरकारी कंपन्यांचे भरीव योगदान
गेल्या तीन वर्षांत सरकारी कंपन्यांनीही या निधीसाठी पीएम केअर्स फंडासाठी भरभरून मदत केली होती. मागील वर्षी प्रकाशित केलेल्या अहवालानुसार फंडात सरकारी कंपन्यांनी 2900 कोटींहून अधिक देणग्या दिल्या आहेत. अहवालानुसार, गेल्या तीन वर्षांत 57 सरकारी कंपन्यांनी 2913.6 कोटी रुपये दान दिले असून, ते एकूण देणगीच्या 59.3 टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे.