Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Moonlighting employees: मूनलाइटिंगमधून कमाई करणाऱ्यांवर आयकर विभागाची नजर; अकराशे कर्मचाऱ्यांना नोटीस

Moonlighting employee income tax

Image Source : www.news18.com

जर तुम्ही मूनलाइटिंगमधून मिळालेले उत्पन्न रिटर्न फाइल करताना दाखवले नसेल तर अजूनही वेळ गेली नाही. कारण, आयकर विभागाने उत्पन्न लपवणाऱ्यांना नोटीस पाठवण्यास सुरुवात केली आहे. Revised ITR फाइल करून तुम्ही हे उत्पन्न अद्यापही दाखवू शकता.

Moonlighting employee: जर तुम्ही मूनलाइटिंग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आयकर विभागाने अकराशेपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना उत्पन्न लपवल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. पूर्णवेळ नोकरीसोबत मूनलािटिंग मधून मिळालेले उत्पन्न दाखवले नसल्याचे तपासात उघड झाले आहे.  

मूनलाइटिंगमधून मिळणारे उत्पन्न लपवले

भारतात कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर वर्क फ्रॉम होमची प्रथा रूढ झाली. या कालावधीत अनेक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी पूर्ण वेळ नोकरीसोबत दुसरे कामही केले. यास मूनलाइटिंग असे म्हणतात. त्यातून अनेकांना नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले. मात्र, मागील तीन वर्षांपासून अनेक कर्मचाऱ्यांनी आयटीआर रिटर्न भरताना मूनलाइटिंगमधून मिळणारे उत्पन्न दाखवले नाही. अशा व्यक्तींना आता नोटीस पाठवण्यास सुरूवात केली आहे. 

आणखी कर्मचाऱ्यांना नोटीस मिळण्याची शक्यता

सध्या 2019-2020 आणि 2020-2021 या आर्थिक वर्षातील उत्पन्न लपवल्याप्रकरणी नोटीस पाठवण्यात येत आहेत. 2021-22 आर्थिक वर्षातील रिटर्नची तपासणी आयकर विभागाने अद्याप केली नाही. त्यामुळे आणखी कर्मचाऱ्यांना नोटीस येण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. 

किती उत्पन्न असणाऱ्यांना नोटीस?

मूनलाइटिंगमधून 5 ते 10 लाख रुपये उत्पन्न मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात नोटीस पाठवण्यात येत आहे. यापेक्षा जास्त उत्पन्न कमावणाऱ्यांचीही माहिती घेतली जात आहे. मूनलाइटिंग कामांचे पेमेंट सहसा ऑनलाइन पद्धतीने होत असल्याने आयकर विभागाला असे व्यवहार शोधणे सोपे झाले आहे. बरेच कामे ही परदेशातून येत असल्याने फॉरेन एक्सचेंजमध्येही व्यवहार झाले आहेत. कॅश पेमेंटचाही तपास सुरू आहे. 

कोणत्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक नोटीस?

आयटी, अकाउंटिंग, व्यवस्थापन क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. यातील काही कर्मचाऱ्यांना दोन पेक्षा जास्त कामांतूनही पैसे मिळाले आहेत. दरम्यान, काही कंपन्यांनी मूनलाइटिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती आयकर विभागाला पॅनकार्डसहित दिल्याचेही समोर येत आहे.

अद्यापही वेळ गेली नाही?

2022-23 साठी आयकर रिटर्न फाइल करण्याची मुदत जरी संपली असली तरी दंड भरून 31 डिसेंबर 2023 पर्यंत रिटर्न फाइल करता येईल. तसेच रिवाइज्ड रिटर्नही 31 डिसेंबरच्या आत दुरूस्त करून भरता येईल. त्यामुळे जर मूनलाइटिंगमधून तुम्ही उत्पन्न मिळवले असेल ते उत्पन्न अद्यापही दाखवू शकता. आयकर रिफंड मिळाला असला तरीही हे काम करता येईल.