Trident Group IT Raids: ट्रायडंट ग्रूपच्या देशभरातील कार्यालयांवर आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आले आहेत. टेक्सटाइल, पेपर, स्टेशनरी, केमिकल, पावर, यार्न अशा विविध क्षेत्रांमध्ये ट्रायडंट ग्रूपचा व्यवसाय विस्तार आहे. छाप्याची माहिती मिळताच कंपनीचे शेअर्स सुमारे 3 टक्क्यांनी खाली आले आहेत.
आयकर विभागाच्या छाप्यामागील कारण काय?
ट्रायडंट ग्रूप आणि सहयोगी कंपन्यांनी केलेले आर्थिक व्यवहार आणि कर भरणा नियमानुसार आहे का? हे तपासण्यात येत आहेत. पंजाब, मध्यप्रदेशसह विविध राज्यात कंपनीची कार्यालये आहेत. आयकर विभागाच्या टीमकडून कंपनीची कागदपत्रे आणि व्यवहार तपासण्यात येत आहेत.
आर्थिक व्यवहारात अनियमितता असल्याचा संशय आयकर विभागाला आहे. पद्मश्री राजेंद्र गुप्ता हे ट्रायडंट ग्रूपचे मालक आहेत. मध्यप्रदेशातील बुधानी आणि पंजाबमधील बरनाला आणि धौला या ठिकाणी कंपनीचे निर्मिती प्रकल्प आहेत. बुधानी येथील प्रकल्पात आयकर विभागाचे 40 पेक्षा जास्त अधिकारी कागदपत्रांची तपासणी करत आहेत. छापेमारी सुरू असल्याने याबाबत सविस्तर माहिती हाती आली नाही.
कंपनीचे मालक, अधिकाऱ्यांशी संबंधित मालमत्ता, कार्यालये आणि निर्मिती प्रकल्पांवर छापा मारण्याचे काम सुरू आहे. आज मंगळवारी दुपारपर्यंतही कारवाई सुरू होती. 90 च्या दशकात ट्रायडंट ग्रूपची स्थापना झाली आहे. 30 पेक्षा जास्त ठिकाणी छापे मारल्याची माहिती समोर येत आहे.