Tax evasion through cash transaction: आयकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. जर तुम्ही 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार कॅशमध्ये करत असाल तर तुम्हाला कदाचित आयकर विभागाची नोटीस येऊ शकते. तसेच ज्या दुकानदाराकडून किंवा संस्थेसोबत तुम्ही व्यवहार केला आहे त्याचीही चौकशी होऊ शकते. आयकर विभागाच्या नियमानुसार 2 लाख रुपयांपेक्षा मोठ्या रकमेचे व्यवहार सरकारला कळवणे आवश्यक आहे. मात्र, असे होत नसल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे.
कोणावर राहणार नजर?
हॉटेल, लक्झरी बँक्वेट्स, महागडी शॉपिंगची दुकाने, IVF सेंटर्स, डिझायनर शॉपिंग सेंटर्स सह इतरही आस्थापने जेथे नागरिक रोखीने व्यवहार करतात. असे सर्व व्यवहार आता आयकर विभाग पडताळून पाहणार आहे. (Tax evasion through cash Transaction) 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या वस्तू किंवा सेवा रोखीने खरेदी विक्री करत असाल तर दुकानदाराला किंवा संस्थेला SFT-013 या फॉर्मद्वारे सरकारला माहिती देणे बंधनकारक आहे. मात्र, अनेकजण या व्यवहारांची माहिती सरकारला देत नाहीत.
कर चुकवेगिरी होत असल्याचा संशय?
रोखीने व्यवहार करून नागरिक, दुकानदार आणि आस्थापने मोठ्या प्रमाणात कर चुकवत असल्याचा संशय आयकर विभागाला आहे. त्यामुळे अशा व्यवहारांची माहिती जमा करण्यास आयकर विभागाने सुरू केली आहे. कर चुकवण्याकरिताही नागरिक रोखीने बिल पेमेंट करत असावेत, असे आयकर विभागाच्या निदर्शनास आले आहे.
अशा व्यवहारांसाठी जे पैसे वापरले त्यांच्या स्रोत आयकर विभागाकडून पडताळण्यात येणार आहे. जर कर बुडवल्याचे आढळून आले तर दुकानदार आणि नागरिकांना नोटीस येऊ शकते. तसेच एकाच व्यवहारासाठी कुटुंबातील अनेक सदस्यांची पॅन कार्ड वापरली असतील तर हे व्यवहारही आयकर विभाग तपासून पाहणार आहे. यातून आयकर विभागाला करदात्याचे उत्पन्न आणि खर्चातील तफावत लक्षात येईल.