उत्पन्नावरील करबचत करण्याचा अनेकजण प्रयत्न करतात. आयकर कायद्यातील विविध तरतुदींद्वारे करवजावट मिळवता येते. त्यापैकी 80G नुसार राजकीय पक्ष, संस्था किंवा चॅरिटेबल संस्थांना डोनेशनवर करवजावट मिळवता येते. मात्र, काही करदात्यांनी बनावट डोनेशनद्वारे करबचत करण्याचा प्रयत्न केल्याचे आयकर विभागाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वापराने असे रिटर्न तपासण्यात येत आहेत.
जुने आयटीआर रिटर्नही तपासणार
आयकर विभागाने मागील काही वर्षांतील आयटीआर रिटर्नची फेरतपासणी सुरू केली आहे. त्यासाठी AI चा वापर केला जात आहे. बनावट किंवा प्रमाणापेक्षा जास्त डोनेशन दिलेले करदाते याद्वारे ओळखता येऊ शकतात. 2019 साली लोकसभा निवडणुका झाल्या. यावर्षी अनेक करदात्यांनी राजकीय पक्षांना बनावट देणगी दिल्याचा अंदाज आयकर विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे या सालातील आयकर परतावे पुन्हा नव्याने पडताळून पाहिले जात आहेत.
80G नुसार तुम्ही करपात्र उत्पन्नाच्या 10 टक्के रक्कम देणगी देऊ शकता. या देणगीवर तुम्हाला 50% किंवा 100% वजावट मिळू शकते. तसेच कलम 80GGA आणि 80GGC अंतर्गत देणग्या आणि देणग्यांवर कर कपातीचा दावा केला जाऊ शकतो. आयकर विभाग बनावट देणगीद्वारे करकपातीच्या प्रकरणांची चौकशी करत आहे.
बनावट डोनेशन आढळून आल्यास नोटीस येऊ शकते
ज्या करदात्यांनी यापूर्वीही बनावट डोनेशन करून करवजावट मिळवली असेल त्यांना आता नोटीस येऊ शकते. या नोटिशीला उत्तर दिले नाही किंवा आवश्यक पुरावे दिले नाही तर दंडात्मक कारवाई होऊ शकते. कर बुडवलेल्या रकमेच्या 200% पर्यंत दंडाची रक्कम असू शकते. ज्या करदात्यांचे उत्पन्न जास्त आहे त्यांचे आयटीआर प्राधान्याने पडताळण्यात येतील. त्यासाठी कालवधीही ठरवण्यात आला आहे.
कॉम्प्युटराइज्ड सिस्टिममुळे आयकर विभागाला घोटाळा शोधण्यास सोपे झाले आहे. त्यात आता कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे करचुकवेगिरी शोधून काढणे आणखी सोपे झाले आहे. ज्या करदात्यांनी चॅरिटेबल संस्थांना किंवा राजकीय पक्षांना देणगी दिली आहे त्याची माहिती कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे पडताळून पाहिली जात आहे. जेथे अनियमितता दिसून येईल त्या खातेदारांना नोटीस पाठवण्यात येत आहे.