जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आर्थिक नियोजन गरजेचे आहे. विशेषत: नोकरदारांसाठी आर्थिक नियोजन अत्यंत गरजेचे आहे. कारण, नोकरीमध्ये दर महिन्याला एक ठराविक रक्कम हातात येत असते. त्यातूनच सर्व खर्च भागवावे लागतात आणि भविष्यासाठीही गुंतवणूक करावी लागते. जर आर्थिक नियोजन केले नाही अचानक येणारे खर्च भरून काढताना कसरत होऊ शकते. निवृत्तीनंतरही उत्पन्नाचे काही साधन नसेल तर आधीच गुंतवणूक करायला सुरुवात करायला हवी.
निवृत्ती नियोजन
शिक्षण संपवून नोकरी सुरू केल्यानंतर काही दिवसानंतरच निवृत्तीनंतरच्या काळासाठीचे नियोजन सुरू करायला हवे. भांडवली बाजाराशी लिंक्ड असणाऱ्या योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे. दीर्घ काळामध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळेल. समजा, तुम्ही सध्या ३० वर्षांचे असाल आणि निवृत्ती वय 60 समजू. तुम्ही पुढील ३० वर्षांसाठी ठराविक रक्कम रिटायरमेंट फंडमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. नॅशनल पेन्शन स्कीम, अटल पेन्शन योजना, प्रधान मंत्री व्यय वंदना योजना, एम्पलॉई पेन्शन स्कीम यांसारख्या योजनांमध्ये तुम्ही आतापासूनच गुंतवणूक केली पाहिजे.
मुलांचे शिक्षणासाठी नियोजन
चाइल्ड एज्युकेशन प्लॅन तुमच्या मुलांचे भवितव्य सुरक्षित करतो. लहान वयात शिक्षणाचा खर्च कमी असतो. मात्र, उच्च शिक्षणासाठी जास्त पैसे लागतात. त्यामुळे जर आतापासूनच मुलांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक सुरू केली तर भविष्यात अडचण येणार नाही. म्युच्युअल फंड, एफडी, एलआयसी आणि सरकारी अनेक योजना आहेत. यापैकी कोणत्याही योजनेत तुम्ही पैसे गुंतवू शकता. कमी जोखीम आणि जास्त जोखीम असे दोन्ही प्रकारचे प्लॅन बाजारात आहेत. त्यापैकी योग्य योजना तुम्ही निवडून मुलांच्या शिक्षणाची चिंता सोडवू शकता.
मार्केट लिंक्ड गुंतवणुकीच्या योजना
पारंपारिक गुंतणूकीच्या पर्यायांपेक्षा मार्केट लिंक्ड प्लॅनमध्ये गुंतवणूक केली तर भविष्यात चांगला परतावा मिळण्याची शक्यता असते शेअर बाजार, म्युच्युअल फंड, डेब्ड फंड, इक्विटी फंड असे अनेक पर्याय गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यातील मोठ्या खर्चासाठी तुम्हाला निधी उपलब्ध होईल. भांडवल बाजाराबाबत चांगली माहिती नसेल तर तुम्ही आर्थिक सल्लागाराकरवीही गुंतवणूक करू शकता किंवा स्वत: गुंतवणूक न करता फंड कंपनीद्वारे गुंतवणुकीला प्राधान्य द्यायला हवे.
आरोग्य विमा/जीवन विमा
आरोग्य विमा आणि जीवन विमा हे दोन्हीही अत्यंत महत्त्वाचे आहेत. संपुर्ण कुटुंबाचा आरोग्य विमा हवा. अचानक रुग्णालयात भरती होण्याची वेळ आली तर तुम्हाला बचतीमधून पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही. तसेच कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा टर्म इन्शुरन्स असेल तर त्याच्या मृत्यूपश्चात कुटुंबाला आर्थिक मदत होऊ शकते. 50 लाख 1 कोटी असे टर्म इन्शुरन्सचे अनेक पर्याय बाजारात आहेत. तुमच्या गरजेनुसार तुम्ही टर्म इन्शुरन्स काढू शकता. तुमच्या आर्थिक जबाबदाऱ्या आणि प्रिमियम भरण्याची क्षमता यानुसार योग्य प्लॅन निवडा.