आजकल बाजारात सर्वच बँका अनेक प्रकारची कर्ज देत आहेत. रोज किमान 2 बँकेतून तुम्हाला एवढं-एवढं कर्ज मिळेल अशा आशयाचे मॅसेज फोनवर येत असतील. पण प्रत्यक्षात तुम्ही बँकेकडे कर्जाची विचारणा करण्यास गेला तर अनेक कारणं सांगून तुमचा कर्जाचा अर्ज बाजूला टाकला जाऊ शकतो. अशावेळी आपला अर्ज कोणत्याही कारणामुळे बाजूला पडू नये म्हणून काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही बँकेतील व्यवहार पारदर्शक ठेवले तर कर्ज मिळणे सोपे होऊ शकते. कर्ज मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे ते पाहुया.
विद्यमान कर्ज पूर्ण करा
जर तुम्ही जुने कर्ज फेडत असाल तर तुम्हाला नवीन कर्ज मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. बँका तुम्हाला कर्ज-ते-उत्पन्न गुणोत्तराच्या आधारावर कर्ज मंजूर करतात. हे प्रमाण कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरल्या जाणार्या एकूण मासिक उत्पन्नाचे प्रमाण दाखवते. अशा पेमेंटमध्ये वैयक्तिक कर्ज, कार लोन इत्यादींसाठी ईएमआय (EMI) यांचा विचार केला जातो. जर का तुम्हाला नवीन कर्ज घ्यायचे असेल तर सध्या सुरु असलेले कर्ज पूर्ण करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास बँकेकडून कर्जाचा अर्ज स्वीकारला जात नाही.
सिबिल स्कोर सुधारा
सिबिल स्कोअर (CIBIL Score) सुधारण्याचा अतिशय सोपा मार्ग आहे. यासाठी तुम्हाला कर्ज आणि क्रेडिट कार्डचे बिल नियमितपणे भरणे आवश्यक आहे. क्रेडिट युटिलायझेशन रेशो (Credit Utilization Ratio CUR) कमी पातळीवर ठेवा. म्हणजेच, तुमच्या क्रेडिट कार्डच्या खर्चाच्या मर्यादेपैकी फक्त 20 ते 30 टक्के रक्कम खर्च करा. डिफॉल्ट आणि कर्ज सेटलमेंट टाळा. याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर वाईट परिणाम होऊ शकतो. क्रेडिटवर एकाच वेळी अनेक उत्पादने खरेदी करू नका. यामुळे क्रेडिट स्कोअर कमी होण्याची शक्यता असते.
संयुक्त कर्ज घ्या/ उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत दाखवा
गृहकर्जासारखी मोठी कर्ज हवी असतील तर असे कर्ज मिळण्याची शक्यता वाढवण्यासाठी संयुक्त कर्ज घेण्याचा पर्याय फायदेशीर ठरू शकते. याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. अशा प्रक्रियेत जोडीदारांपैकी एकाला सह-अर्जदार बनवले जाते. यामुळे पात्रता वाढते. एवढेच नाही तर अनेक अतिरिक्त फायदेही मिळतात. उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत असल्यास. उदाहरणार्थ, तुमचे भाडे किंवा व्यवसायाचे उत्पन्न असले तरीही, तुमची कर्ज पात्रता वाढते. अशा प्रकारे, जर तुमच्याकडे दुसरे घर असेल तर ते भाड्याने घ्या आणि हे उत्पन्न मासिक आवकमध्ये दाखवा.
दीर्घ मुदतीचे कर्ज निवडा
दीर्घ मुदतीचा पर्याय निवडणे हा देखील एक पर्याय आहे. या पर्यायाने थोडे नुकसान होते. कर्जाचा कालावधी वाढल्याने कर्जाच्या व्याजावरील रक्कमही वाढते. उदाहरणार्थ, जर तुम्ही 50 लाख रुपयांचे कर्ज 20 वर्षांसाठी 9 टक्के दराने घेतले असेल. तर, दरमहा ईएमआय (EMI) 44,986 रुपये असेल. यामध्ये एकूण 57.96 लाख रुपये व्याज भरावे लागणार आहे. जर तेच कर्ज 25 वर्षांसाठी घेतले तर ईएमआय 41,960 रुपयांपर्यंत खाली येईल. परंतु, एकूण व्याज 75.87 लाख रुपये होईल. पाच वर्षांच्या मुदतवाढीसह कर्ज 17.91 लाख रुपयांनी कसे महाग झाले ते तुम्ही पाहू शकता. दीर्घ मुदतीच्या कर्जामध्ये ईएमआय (EMI) कमी आहे. अशा प्रकारे कमी उत्पन्न असलेले देखील कर्ज घेण्यास पात्र होतील.
एका वेळी अनेक ठिकाणी कर्जासाठी अर्ज करू नका
जेव्हा तुम्ही वैयक्तिक कर्जासह कोणत्याही कर्जासाठी अर्ज करता तेव्हा कर्जदार डीफॉल्टच्या धोक्याचा अंदाज घेण्यासाठी क्रेडिट ब्युरोकडे तुमच्या क्रेडिट स्कोरची चौकशी करते.एकाच वेळी अनेक ठिकाणी तुम्ही कर्जासाठी अर्ज केल्यास तुमचा क्रेडिट स्कोर कमी होऊ शकतो. परिणामी तुम्हाला क्रेडिट-हँगरी ग्राहक म्हणून पाहिले जाईल.यामुळे बँक तुमच्या कर्जाचा अर्ज नाकारू शकते. त्यामुळे कर्जासाठी अर्ज करण्याआधी तुम्ही स्वतःचा क्रेडिट स्कोर तपासणं आवश्यक आहे.
कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी आपण कोणत्या बँकेच्या कर्जाच्या पात्रतेत बसतोय हे पाहूनच अर्ज करा. असे केल्याने वेळेत कर्ज मिळू शकते.