ICC Prize Money: इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलने (ICC) स्त्री-पुरुष समानतेबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यापुढे ICC द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये महिला आणि पुरुषांच्या क्रिकेट संघाला सारखेच बक्षीस मिळणार आहे. यापूर्वी पुरुषांच्या संघाला जास्त महत्त्व दिले जात होते. सामन्यातील बक्षिसाची रक्कमही महिला संघापेक्षा जास्त होती. आता ही असमानता संपुष्टात आली आहे.
क्रिकेटमधील असमानता संपली
गुरुवारी (3 जुलै) ICC ने याबाबत अधिकृत माहिती दिली. (ICC announces equal prize) दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे भरलेल्या वार्षिक परिषदेत ICC ने हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. "क्रिकेटच्या खेळातील हा एक ऐतिहासिक क्षण आहे. मला आनंद होत आहे की, यापुढे जागतिक स्तरावर होणाऱ्या स्पर्धांमध्ये महिला आणि पुरुषाच्या संघांना एकसमान बक्षिसाची रक्कम दिली जाईल, असे ICC चे संचालक ग्रेग बार्कले यांनी म्हटले.
"2017 पासून आम्ही महिलांच्या स्पर्धेतील बक्षिसाची रक्कम वाढवत आहोत. महिला आणि पुरुष संघांना समान बक्षीस मिळावे हे आमचे उद्दिष्ट होते. यामुळे ICC महिला आणि पुरुष मेन्स वर्ल्ड कप, ट्वेन्टी ट्वेन्टी कप आणि अंडर नाइन्टीन स्पर्धांमध्ये बक्षिसाची रक्कम समान असेल", असेही ग्रेग बार्कले म्हणाले.
पुरुषांच्या विजेत्या संघाला जास्त बक्षीस
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ वुमन 20-20 वर्ल्ड कप स्पर्धेत विजेता ठरला. या संघाला 1 मिलियन डॉलर बक्षिसाची रक्कम मिळाली. तर उपविजेत्या दक्षिण आफ्रिका संघाला 5 लाख डॉलर रुपये मिळाले. दरम्यान, मागील वर्षी पार पडलेल्या पुरुष 20-20 वर्ल्ड कपमध्ये विजेत्या संघाला 1.6 मिलियन डॉलर बक्षीस मिळाले तर उपविजेत्या पाकिस्तान संघाला 8 लाख मिलियन डॉलर मिळाले होते. ही रक्कम महिला संघाला मिळालेल्या बक्षिसापेक्षा जास्त होती.
2019 साली पुरुषांच्या पन्नास ओव्हरच्या वर्ल्ड कपमध्ये 10 मिलियन डॉलर बक्षीस देण्यात आले. ही रक्कम 2022 साली झालेल्या महिलांच्या वर्ल्डकपपेक्षा तीनपट जास्त होती. महिला विजेत्या संघाला फक्त 3.5 मिलियन डॉलर बक्षीस देण्यात आले होते.
फिफा संघटनेकडेही समान बक्षिसाची मागणी
महिला आणि पुरुष फुटबॉल स्पर्धेतील बक्षिसाची रक्कमही समान करावी, अशी मागणी फिफा संघटनेकडे होत आहे. फिफामध्येही पुरुषांना महिलांच्या तुलनेत बक्षिसाची रक्कम जास्त दिली जाते.