कोरियन कंपनी ह्युंदाई भारतामध्ये कार विक्रीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये कंपनीचे निर्मिती प्रकल्पसुद्धा आहेत. मागील काही दिवसांपासून कंपनीच्या डिझेल इंजिन SUV कारची बाजारातील मागणी वाढली आहे. त्यामुळे कंपनीने डिझेल इंजिनची क्षमता वाढवण्यासाठी आणि गुंतवणूक करण्याची तयारी सुरू केली आहे. कारपासून होणाऱ्या प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारने कठोर नियमावली लागू केली असली तरी डिझेल इंजिन कारची मागणी वाढत असल्याने कंपनी अधिक चांगल्याप्रकारच्या गुणवत्तेसाठी गुंतवणूक करत आहे.
मागील वर्षात एकूण कारविक्रीपैकी ह्युंदाईने 26% डिझेल कार बाजारात विकल्या. SUV गाड्यांची मागणीही वाढत आहे. कोरोनापुर्वी डिझेल गाड्यांची जेवढी विक्री होत होती, त्याच प्रमाणात आताही गाड्यांची विक्री होत आहे, असे ह्युंदाईचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर तरुण गर्ग यांनी म्हटले आहे. एकूण विक्री झालेल्या क्रेटा गाड्यांपैकी 54 टक्के गाड्या डिझेल श्रेणीतील आहेत. तर अल्कझार आणि ट्युकसन प्रत्येक 75% आणि 72 टक्के आहेत. एकून विक्री झालेल्या गाड्यांचा विचार करता सुमारे 53 टक्के SUV गाड्यांना मागणी आहे, असे गर्ग म्हणाले.
देशांतर्गत बाजारपेठेत मागील पाच वर्षात एकूण प्रवासी गाड्यांपैकी SUV गाड्यांची विक्री पाचपट वाढली आहे. यापैकी प्रिमियम SUV गाड्यांमध्ये डिझेल व्हेरियंटला मागणी जास्त होती. 2021 साली हाय एंड SUV मध्ये 94% डिझेल गाड्या विकल्या गेल्या. तर मिड कॅटेगरीत 64% डिझेल गाड्या विकल्या गेल्या. ह्युंदाईच्या प्रिमियम गाड्यांची मागणी वाढत आहे. ह्युंदाईच्या एकूण विक्री होणाऱ्या गाड्यांपैकी 45 टक्के गाड्यांची किंमत 10 लाखांच्या पुढे आहे, हीच आकडेवारी 2018 साली फक्त 21% होती, असे गर्ग म्हणाले.
ह्युंदाईच्या ट्युकसन गाडीला बाजारात चांगली मागणी आहे. या गाडीची दिल्लीतील एक्स शोरुम किंमत 34.54 लाख रुपये आहे. 2021 वर्षामध्ये 1000 ट्युकसन गाड्यांची विक्री झाली होती. मात्र, 2022 मध्ये हे प्रमाण दुप्पट झाल्याचे गर्ग यांनी सांगितले. या वर्षी पाच ते सहा हजार ट्युसकन कार विक्रीचे उद्दीष्ट कंपनीने ठेवल्याचेही त्यांनी सांगितले.