Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Swiggy : हैदराबादकरानं एका वर्षात इडलीवर खर्च केले 6 लाख! स्विगीचं परीक्षण

Swiggy : हैदराबादकरानं एका वर्षात इडलीवर खर्च केले 6 लाख! स्विगीचं परीक्षण

Swiggy : हैदराबादमधल्या एका व्यक्तीनं इडलीवर वर्षभरात तब्बल 6 लाख रुपये खर्च केले आहेत. स्विगी या फूड डिलिव्हरी (Food delivery) प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या व्यक्तीनं ऑर्डर्स केल्याचं समोर आलंय. 30 मार्च हा जागतिक इडली दिन (World idli day) म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं स्विगीनं आपलं हे विश्लेषण प्रसिद्ध केलं आहे.

रुचकर आणि मनोरंजक बाबी

इडली हा दक्षिण भारतातला एक लोकप्रिय पदार्थ आहे. नाष्ट्यामध्ये याचा समावेश सर्रास केला जातो. या इडलीचा एक प्रेमी आता प्रकाशझोतात आलाय. या इडलीप्रेमीनं 12 महिन्यांच्या कालावधीत 6 लाख रुपयांच्या इडली ऑर्डर्स (Orders) केल्या. 30 मार्च 2022 ते 25 मार्च 2023 या कालावधीचा समावेश यात आहे. या निमित्तानं दक्षिण भारतीय स्वादिष्ट पदार्थ असलेल्या इडलीविषयी काही रुचकर आणि मनोरंजक बाबी स्विगी या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मनं समोर आणल्या आहेत. स्विगीच्या या यूझरनं केवळ स्वत:च नाही तर आपल्या कुटुंबासाठी त्याचबरोबर मित्र-मैत्रिणींसाठीही इडलीच्या ऑर्डर्स केल्याचं समोर आलं आहे.

नातेवाईक अन् मित्रांनाही खायला दिल्या इडल्या

स्विगीचा हा यूझर प्रवासात असताना आपल्या नातेवाईक आणि मित्रांसाठी इडली ऑर्डर करायचा. त्याने तब्बल 8,428 इडल्यांची ऑर्डर दिली. बेंगळुरू आणि चेन्नईसारख्या शहरांमध्ये या ऑर्डर्स मिळाल्याचं स्विगीनं म्हटलं. स्विगीनं गेल्या 12 महिन्यांत इडलीच्या 33 दशलक्ष प्लेट्स वितरित केल्या आहेत. या आकड्यांवरून ग्राहकांमध्ये ही डिश किती प्रचंड प्रमाणात लोकप्रियता आहे हेच दर्शवतं, असं त्यात म्हटलं आहे.

सर्वाधिक ऑर्डर्स कुठे?

बेंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई ही अशी प्रमुख तीन शहरं आहेत जिथं इडली सर्वात जास्त ऑर्डर केली जाते. मुंबई, कोईम्बतूर, पुणे, विशाखापट्टणम, दिल्ली, कोलकाता आणि कोची याठिकाणीदेखील इडली लोकप्रिय आहे. इडली ऑर्डर करण्याची सर्वात सामान्य वेळ म्हणजे सकाळी 8 ते 10 या दरम्यान आहे, असं या विश्लेषणात दिसून आलं आहे. चेन्नई, हैदराबाद, बेंगळुरू, कोईम्बतूर आणि मुंबई येथील ग्राहक रात्रीच्या जेवणाच्या वेळी इडली ऑर्डर करतात. साधारणपणे एक इडलीची प्लेट 30 रुपयांपासून पुढे उपलब्ध असते. त्यात विविध प्रकार पाहायला मिळतात. त्यानुसार दरही बदलतात. तर घरी इडली बनवण्यासाठीचा खर्च हा 30 रुपयांहूनही कमी येतो. 

लोकप्रिय प्रकार

इडलीचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. मात्र सर्व शहरांमध्ये प्लेन इडली हा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. यामध्ये इडलीचे दोन पिसेस दिले जातात. दोन इडलीच्या प्लेटला सर्वाधिक मागणी असल्याचं प्रकाशनात म्हटलं आहे. इतर कोणत्याही शहरापेक्षा बेंगळुरूमध्ये रवा इडली सर्वाधिक अधिक लोकप्रिय आहे. तर तूप/नेई करम पोडी इडली ही तामिळनाडूमध्ये लोकप्रिय आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगाणामधील शहरांमध्येही इडलीचे मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत. 

33 दशलक्ष इडली प्लेट्सचं वितरण

स्विगीनं जे निरीक्षण नोंदवलंय, यानुसार इडली हा पदार्थ दक्षिणेत जरी लोकप्रिय असला तरी सर्वच ठिकाणी इडलीला मोठी मागणी असते. गेल्या वर्षात जवळपास 33 दशलक्ष इडली प्लेट्स वितरित केल्या आहेत, असं स्विगीनं म्हटलंय. ग्राहक त्यांच्या इडल्यांसोबत सांबर, खोबऱ्याची चटणी, करमपुरी (कोरडी चटणी), मेदू वेडा, सागू, तूप, लाल चटणी, जैन सांबर, चहा, कॉफी यासारख्या इतर पदार्थांची ऑर्डरदेखील देतात. बेंगळुरू आणि चेन्नईमधलं अद्यार आनंद भवन, हैदराबादमधलं वरलक्ष्मी टिफिन्स, चेन्नईमधलं संगीता व्हेज रेस्टॉरंट आणि हैदराबादमधले उडीपीचे उपहार ही इडली ऑर्डर्ससाठी लोकप्रिय असलेली पहिली पाच रेस्टॉरंट्स आहेत, असं स्विगीनं म्हटलंय.