Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ITR: शेवटचे 4 दिवस, डेडलाईन चुकल्यास 'हे' परिणाम

ITR: शेवटचे 4 दिवस, डेडलाईन चुकल्यास 'हे' परिणाम

Income Tax Return Filing साठी मुदतवाढ देण्याची मागणी होत असली तर इन्कम टॅक्स विभागाने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ITR फायलिंग करण्यासाठी मुदतवाढ मिळेल या आशेने तुम्ही चालढकल करत असाल तर तुम्हाला हे महागात पडू शकते.

इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंग करण्यासाठी आता अवघे 4 दिवस शिल्लक आहेत. यंदा 31 जुलै 2022 पर्यंत वैयक्तिक करदात्यांना रिटर्न फाईल (ITR Filing 2022) करण्याची मुदत आहे. सध्या तरी ही मुदत वाढेल, अशी शक्यता वाटत नाही. मुदतवाढ देण्याची मागणी होत असली तर केंद्र सरकार किंवा अर्थ मंत्रालयाकडून त्याबाबत अद्याप कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही. त्यामुळे मुदतवाढ मिळेल या आशेने आयटीआर फाईल करण्याबाबत होत असलेली चालढकल तुम्हाला महागात पडू शकते. 

टॅक्स रिटर्नसाठीची डेडलाईन चुकली किंवा त्यानंतर विवरणपत्र सादर केले तर करदात्याला त्यावर विलंब शुल्काचा भुर्दंड सोसावा लागेल. त्याशिवाय विलंब शुल्कासह आयटीआर सादर करण्याचा मनस्ताप होऊ नये, म्हणून टॅक्स विभाग (CBDT) आणि इन्कम टॅक्स विभाग टॅक्स पेअर्सला अंतिम मुदतीपूर्वीच आयटीआर फाईल करण्याचे आवाहन करत आहे.

टॅक्स रिटर्न फायलिंगचा काउंटडाऊन सुरु झाला आहे. आजपासून केवळ 4 दिवस शिल्लक आहे. आयकर विभागाच्या वेबसाईटवरुन आयटीआर फायलिंगची प्रक्रिया अखंड सुरु आहे. येत्या 31 जुलै 2022 रोजी रविवारी रात्री 11.59 मिनिटांपर्यंत करदाते रिटर्न फाईल करु शकतात. 

ITR फायलिंगबाबत महत्त्वाची डेडलाईन

  • वैयक्तिक करदाते आणि वेतनधारकांसाठी 31 जुलै, 2022 ही डेडलाईन
  • अकाऊंट ऑडिट आवश्यक असणाऱ्यांसाठी 31 ऑक्टोबर, 2022 पर्यंत अंतिम मुदत


किती असेल विलंब शुल्क (Late Fees Or Penalty) 

आयकर कायदा 1961 च्या कलम 234A नुसार उशिरा आयटीआर फाईल करणाऱ्या करदात्यांंच्या देय करावर प्रत्येक महिन्याला 1 टक्का व्याज दंड म्हणून आकारण्याची तरतूद आहे. केवळ विलंब शुल्कच भरावे लागणार नाही तर तुम्हाला जर उत्पन्नावर कर भरावा लागणार असेल तर तो व्याजासकट भरावा लागेल. अर्थात जितके दिवस उशीर होणार तितक्या दिवसांचे कर रकमेवर व्याज आकारले जाणार आहे. त्यामुळे टॅक्सपेअर्सनी हा दुहेरी आर्थिक फटका आहे हे लक्षात घ्यावे.  

निर्धारित वेळेत ITR सादर करणाऱ्या टॅक्स पेअर्सला मिळतात हे बेनिफिट्स

  • नियमित आयटीआर भरल्याने आयकर विभागाकडे आपला ट्रॅक रेकॉर्ड चांगला राहतो.  
  • विलंब शुल्काचा तसेच करावरील व्याजाचा भुर्दंड सोसावा लागत नाही.
  • नियमित आणि अंतिम मुदतीपूर्वी आयकर सादर केल्यास करदात्याला कर्ज घेण्यास अडचण जाणवत नाही. कर्ज घेताना आयटीआर हा एक महत्त्वाचा दस्त मानला जातो. 
  • अंतिम मुदतीपूर्वी आयटीआर सादर केला तर करदात्याला त्यावर्षातील तोटा पुढल्या वर्षी कॅरिऑन करता येतो. परिणामी हा तोटा पुढील वर्षी कर रकमेशी अ‍ॅडजस्ट होतो आणि तुलनेने कमी कर भरावा लागतो. 
  • टॅक्स रिफंडसाठी फार काळ प्रतिक्षा करावी लागत नाही. अंतिम मुदतीपूर्वी आयटीआर सादर केला असेल तर रिफंडची रक्कम देखील एक ते दोन आठवड्यात बँक खात्यात जमा होते. 
  • अनेक देशांकडून व्हिसा इश्यू करण्यापूर्वी आयटीआर मागितला जातो. त्यामुळे झटपट व्हिसा मिळवण्यासाठी आयटीआर हा तितकाच महत्वाचा आहे. आयटीआरमध्ये तुमचा उत्पन्नाचा तपशील असल्याने हा एक महत्वाचा पुरावा आहे.  


आयटीआर उशिरा भरल्यास होतो असा परिणाम

  • विलंब शुल्काचा तसेच करावरील व्याजाचा भुर्दंड सोसावा लागतो. 
  • आयकर विभागाकडे आपला ट्रॅक रेकॉर्ड खराब होतो.
  • उशिरा आयटीआर विवरण का सादर केले याबाबत तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस पाठवली जाऊ शकते. 
  • यामुळे करदात्याच्या मागे नाहक कायदेशीर प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे. त्यावर आयकर विभागाला समाधानकारक उत्तर द्यावे लागते.
  • जे टॅक्स रिटर्न फाईल करत नाहीत त्यांना बँका किंवा एनबीएफसी कंपन्यांकडून कर्ज घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.


कोरोना महामारीमुळे दोन वर्ष मिळाली होती मुदतवाढ

कोरोना महामारीमुळे केंद्र सरकारने मागील दोन वर्ष इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंगसाठी दोन ते तीनवेळा मुदतवाढ दिली होती. मुदतवाढीनेमुळे जास्ती जास्त नोकरदार आणि वैयक्तिक करदात्यांनी आयटीआर सादर केले होते. मात्र यंदा मुदतवाढीची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.