• 29 Jan, 2023 14:30

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

एका बँकेतून दुसऱ्या बँकेत गृहकर्ज कसे हस्तांतरित करावे? Home Loan Balance Transfer

एका बँकेतून दुसऱ्या बँकेत गृहकर्ज कसे हस्तांतरित करावे? Home Loan Balance Transfer

गृह कर्जाचे (Home loan) व्याजदर वेळोवेळी बदलत असतात. अशावेळी इतर बँकेकडून कमी व्याज दर मिळत असेल तर त्या बँकेत कर्ज हस्तांतरण केल्यास चांगली बचत होऊ शकते.

आपले एखाद्या मोठ्या कॉम्पलेक्समध्ये आलिशान घर असावे. घरापासून स्टेशन, मार्केट, हॉस्पिटल, शाळा यांसारख्या सुविधा जवळ असाव्यात असे सगळ्यांना वाटत असते. पण आजच्या महागाईच्या काळात घर घेणे तितकेसे सोपे नाहीये. त्यामुळे घर घेताना एखाद्या बँकेकडून कर्ज घेण्याशिवाय पर्याय नसतो. घर घेताना किती लाखांचे कर्ज घ्यायचे? कितीचा हफ्ता भरू शकतो? या सगळ्या गोष्टींचा विचार करणे गरजेचे असते. 

घरासाठी कर्ज घेतल्यानंतर तुमच्या उत्पन्नातील 25 ते 30 टक्के रक्कम घराच्या कर्जाचा हफ्ता भरण्यात जातो. त्यामुळे तुम्हाला कोणताही खर्च करण्याआधी घराच्या हफ्त्याचा पहिला विचार करावा लागतो. अनेकजण कर्ज घेताना फ्लोटिंग व्याजदरानुसार (Floating Interest) कर्ज घेतात. हा व्याज दर सतत बदलत असल्याने कर्जदाराला त्यानुसार आर्थिक गणिते मांडावी लागतात. अनेकवेळा कर्ज घेतल्यानंतर कर्ज फेडेपर्यंत त्याच बँकेत कर्ज ठेवायचे अशी सर्वसामान्यांची समजूत असते. पण कधीही कर्ज घेतल्यानंतर दुसऱ्या बँकेकडून चांगला व्याज दर मिळतो का हे पाहाणे फायद्याचे ठरू शकते. सध्या सुरू असलेले कर्ज दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर केल्यास तुम्ही चांगली बचत करू शकता. तसेच तुमच्या भविष्यातील आर्थिक नियोजनाविषयी हा एक चांगला निर्णय ठरू शकतो.

उदाहरणार्थ, तुम्ही एका बँकेकडून 30 लाखांचे गृहकर्ज घेतले. त्यासाठी 10.60 टक्के इतका व्याज दर असून त्यासाठी तुम्हाला 30 हजार 153 रूपये इतका हफ्ता बसतो. पण तुम्हाला दुसऱ्या बँकेकडून 10.35 टक्के इतका व्याज दर मिळाला तर तुमचा 503 रुपयांनी कमी होऊ शकतो आणि हे 503 रुपये तुम्ही दर महिन्याला वाचवू शकता. हा कर्जाचा हफ्ता तुम्ही 15 ते 20 वर्षे भरणार असल्याने भविष्यात तुमचे लाखो रुपये वाचू शकतात.

तुम्ही कर्ज घेतलेल्या बॅंकेपेक्षा दुसऱ्या बॅंकेच्या कर्जावरील व्याजदर कमी असेल तर त्या बँकेत कर्ज ट्रान्सफर करायचे का? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण कर्जाचे ट्रान्सफर (हस्तांतरण) करताना व्याज दरासोबतच आणखी काही गोष्टी तपासणे गरजेचे असते. याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

कर्जाचे हस्तांतरण करताना या गोष्टींची माहिती करून घ्या

कोणत्याही बँकेकडून कर्ज घेताना बँकेला प्रक्रिया फी (Bank Processing Fee) द्यावी लागते. प्रत्येक बँकेची Processing Fee वेगवेगळी असते. त्यामुळे बँकेची प्रोससिंग फी जाणून घेणे.

गृह कर्ज हस्तांतरण करताना किती कर्ज शिल्लक राहिले आहे याची चौकशी करावी आणि मगच शिल्लक राहिलेले कर्ज दुसऱ्या बँकेत हस्तांतरित करण्यासाठी अर्ज करावा.

दुसऱ्या बँकेने तुम्हाला कर्ज देण्यास मान्य केल्यानंतर, तसे अधिकृत पत्र दिल्यानंतर सध्या ज्या बँकेत कर्ज सुरू आहे त्या बँकेला तसे कळवावे.

जुनी बँक आणि नवीन बँक हे कशाप्रकारे प्रक्रिया करणार आहेत. यासाठी कोणती कागदपत्रे नव्याने तयार करावी लागणार याची चौकशी दोन्ही बॅंकेकडे करावी.

दुसऱ्या बँकेत कर्ज हस्तांतरित करण्याआधी जुन्या बँकेकडून जागेचे सर्व कागदपत्रे परत करण्यात आले का हे तपासणे गरजेचे असते.

कर्ज हस्तांतरण केल्यानंतर जुन्या बँकेकडून कर्जाचा हप्ता बंद झाला का आणि नवीन बँकेतून हप्ता सुरू झाला का हे तपासावे.

एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे कर्जाचे हस्तांतरण व्हायला सुट्ट्यांचे दिवस वगळून 10 ते 12 दिवस लागतात.

तुमचे गृहकर्जावरील व्याज इतर बँकांच्या तुलनेत जास्त आहे असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही याबाबत तुमच्या सध्याच्या बँकेशी देखील चर्चा करू शकता. अनेकवेळा आपल्या ग्राहकाने दुसऱ्या बँकेत कर्ज हस्तांतरित करू नये यासाठी बँकेकडून गृहकर्जाचे व्याज कमी करून दिले जाते. त्यासाठी बँकेकडून फी आकारली जाते. ही फी एकदाच घेतली जात असून ही फी खूपच कमी असू शकते.