Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

How To Save Tax : पगारातल्या ‘या’ सात घटकांमुळे होऊ शकते करात बचत

Salary Components

Image Source : www.https://scripbox.com/

How To Save Tax : जानेवारी महिना उजाडल्यावर सगळ्यांना मार्चमध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षापूर्वी करायच्या गुंतवणुकीचे वेध लागतात. पण, याचं नियोजन दर महिन्यला मिळणाऱ्या पगारापासून तुम्ही सुरू करू शकता. पगारात ‘हे’ भत्ते अंतर्भूत असतील तर तुमचं कर दायित्व आपोआप कमी होणार आहे. आणि TDS कमी कापला जाणार आहे. तुम्हाला हे भत्ते लागू होत असतील तर नक्की याचा लाभ घ्या.

तुम्हाला महिन्याचा पगार मिळतो तेव्हा पगाराबरोबर मिळणारी पगाराची पावती (Salary Slip) तुम्ही नीट बघितली आहे का? या पावतीमध्ये तुम्हाला मिळणारा पगार वेगवेगळ्या घटकांमध्ये (Salary Components) विभागलेला असतो. यात बेसिक पगार (Basic Pay) असतो. आणि तुम्हाला मिळणारे इतर भत्तेही (Allowances) असतात. शिवाय पावतीच्या उजव्या बाजूला तुमच्या पगारातून विविध कर आणि निवृत्तीवेतन योजनेसाठी पगारातून होणारी वजावटही नमूद केलेली असते. आणि ही बेरिज-वजाबाकी केल्यावर हातात पडतो तो असतो टेक - अवे (Take-Home Salary) किंवा हातात पडणारा पगार.      

यातला वजावटीचा भाग सध्या सोडून देऊया. पण, जमा होणाऱ्या पगारांमध्ये वेगवेगळे भत्ते एकदा नक्की नजरेखालून घाला. कारण, त्यातून तुम्ही मिळकतीवर लागणारा आयकर वाचवू शकणार आहात. महत्त्वाचं म्हणजे अशा भत्त्यांमुळे तुमच्या पगारातून वजा होणारा TDS ही वाचू शकणार आहे. अशा कुठल्या भत्त्यातून कर बचत शक्य आहे ते पाहूया… हे भत्ते समजून घेताना एक लक्षात घ्या या भत्त्यांमधून मिळणारी ठरावीक रक्कमच करातून बचतीसाठी उपयोगी पडते. उर्वरित रकमेवर आपल्याला कर रचनेप्रमाणे कर भरावाच लागेल. कर बचतीची ही मर्यादाही समजून घेऊया.      

घर भाडे भत्ता - HRA     

पगारदार व्यक्ती भाड्याच्या घरात राहात असेल तर ठरावीक रकमेची कर बचत त्यातून शक्य आहे. आयकर कायद्याच्या कलम 10(13A) नुसार, खालील पर्यायांमध्ये सगळ्यात कमी दायित्व असलेला पर्याय आयकर विभागातर्फे ग्राह्य धरण्यात येतो.      

  • पगारात HRA अंतर्गत मिळालेली एकूण रक्कम (आर्थिक वर्षासाठी)    
  • पगाराला 50% हिस्सा (बेसिक पगार + महागाई भत्ता) जर महानगरांमध्ये राहात असाल तर इतर शहरांमध्ये पगारातला 40% भाग गृहित धरला जातो    
  • मिळणाऱ्या वार्षिक पगाराच्या (बेसिक पगार + महागाई भत्ता) 10% रक्कम किती होते ते काढलं जातं. आणि त्यापेश्रा जास्त भरलेल्या घरभाड्यावर करातून सूट लागू होते.     

या तीन उदाहरणांमध्ये जी सगळ्यात कमी रक्कम भरते, ती रक्कम करातून सूट मिळवण्यासाठी गृहित धरली जाते. पाहिजे तर गुंतवणूक तज्ज्ञांकडून हे गणित सविस्तर समजून घ्या.      

प्रवास भत्ता (LTC/LTA)    

ही सूट आयकर कायदा कलम 10(5) अंतर्गत लागू होते. पगारदार व्यक्तीने सहकुटुंब केलेली देशांतर्गत सहल ही करातून सूट मिळवून देऊ शकते. नोकरीतून रजा घेऊन केलेली अशी सहल अशा सुटीसाठी पात्र आहे. अशा सहलीत केलेल्या प्रवास खर्चावर सूट मिळते. प्रवास हा रेल्वे, विमान किंवा सार्वजनिक वाहतुकीतून केलेला असला पाहिजे.      

चार कॅलेंडर वर्षांत केलेले असे दोन प्रवास अशा कर बचतीसाठी पात्र आहेत. त्यामुळे तुमच्या पगारात एक घटक LTC चा असेल आणि त्याचा उपयोग तुम्ही केलात तर अशा प्रवासात तिकिटावर केलेल्या खर्चावर तुम्हाला कर बसणार नाही. तुमच्या कंपनीकडून तुम्हाला किती LTA दिला जातो तेवढी सूट तुम्हाला मिळेल.      

मुलांच्या शिक्षणासाठी मिळणारा भत्ता     

यामध्ये तुमच्या प्रत्येक मुलासाठी दर महिन्याला शंभर रुपयांपर्यंतची रक्कम ही करमुक्त असते. आणि दोन मुलांपर्यंत ही सूट मिळते. म्हणजे तुम्हाला दोन मुलं असतील तर त्यांचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत दर महिन्याला दोनशे असे वर्षाला 2,400 रुपयांच्या खर्चावर तुम्हाला करातून सूट लागू होईल.      

गणवेश भत्ता     

कंपनीत काम करत असताना तुम्हाला गणवेश वापरावा लागत असेल तर तो खरेदी करणं आणि त्याची देखभाल करणं यासाठी होणाऱ्या खर्चावर अनेकदा कंपनी तुम्हाला भत्ता देऊ करते. आणि या भत्त्यावर करातून सूट लागू होते. तुमचा जितका खर्च होईल तेवढा भत्ता तुम्हाला लागू होतो.      

पुस्तकं, नियतकालिकं यांवर मिळणारा भत्ता     

तुम्हाला वाचनाची आवड असेल तर त्यासाठी तुम्ही कंपनीकडून भत्ता मागून घेऊ शकता. म्हणजे तुमच्या पगारात तशी सोय करू शकता. कारण, पुस्तकं, वर्तमानपत्रं तसंच नियतकालिकं विकत घेण्यासाठी कंपनीकडून मिळणारा भत्ता हा करमुक्त असतो. कंपनी जितका भत्ता तुम्हाला देत असेल तो सर्व करमुक्त असतो. पगाराच्या घटकांमध्ये तशी नोंद मात्र हवी.      

कामाच्या जागी बदली झाल्यास मिळणारा भत्ता     

तुम्ही काम करत असलेली कंपनी कामासाठी दुसऱ्या ठिकाणी तुमची बदली करू शकते. असं झालं तर तुम्हाला दुसऱ्या गावात सामान हलवण्यासाठी कंपनीकडून भत्ता मिळतो. किंवा त्यासाठी तुम्ही केलेला प्रवास खर्च आणि सामान हलवण्याचा खर्च तुम्हाला कंपनीकडून पावत्या सादर करून परत मिळवता येतो. काही कंपन्या पहिल्या पंधरा दिवसांसाठी तुमची राहण्याची सोयही करतात. अशा खर्चासाठी तुम्ही कंपनीकडून घेतलेले भत्ते हे करमुक्त आहेत. त्यांच्या पावत्या सादर करण्याची एकमेव अट यासाठी आहे.      

मदतनीसासाठी मिळणारा भत्ता     

काहीवेळा कंपनी तुम्हाला कार्यालयीन कामासाठी मदतनीस नेमण्याची किंवा एखादं काम बाहेरून करून घेण्याची (Outsourcing) मुभा देते. अशा कामासाठी तुमचा होणारा खर्च कंपनीच करत असते. तो तुमच्या पगारात समाविष्ट असेल तर त्यावर कर लागणार नाही.      

याशिवाय पगारातून कर वाचवण्याचे आणखीही काही उपाय असू शकतात. त्यामुळे पगार ठरवताना किंवा त्याचं पुनर्रचना करताना कर बचतीचा फायदा देणारे पर्यायच निवडा. याला सॅलरी स्ट्रक्टर किंवा पगाराची रचना असं म्हणतात. डोकं लढवून ही पुनर्रचना करून घ्या.