नवीन उद्योग सुरु करण्यासाठी किंवा उद्योग वाढवण्यासाठी, त्याचा विस्तार करण्यासाठी कर्ज घ्यावे लागतेच. सध्या उद्योग कर्जाला मोठी मागणी आहे. बऱ्याच बॅंका आणि वित्तीय संस्था व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देतात. पण व्यवसायासाठी कर्ज घेण्यापूर्वी, तुम्ही कोणत्या प्रकारचा उद्योग करणार आहात, हे निश्चित करणे आवश्यक आहे. तसेच त्या उद्योगासाठी एकूण किती भांडवल लागू शकते, याचा जर योग्य विचार आणि आर्थिक गणितं मांडली असतील तर सदर उद्योगासाठी किती कर्ज घ्यायचे हे निश्चित करता येते.
बँकेकडून तारण (Secured) आणि विनातारण (Unsecured) असे 2 प्रकारे कर्ज मिळते. जर तुम्ही लघुउद्योग सुरु करत असाल तर भारतीय लघु उद्योग विकास बँकेद्वारे एमएसएमई (MSME) आणि स्टार्टअप्सना (Start-Ups) थेट कर्ज देण्यास सुरुवात केली आहे. तसेच अनेक बँकांकडून महिला उद्योजकांना विशेष कर्ज दिले जाते. कोणताही पगारदार व्यक्ती, अभियंता डॉक्टर, आर्किटेक्ट, चार्टर्ड अकाउंटंट किंवा किमान 2 वर्षे व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेली व्यक्ती व्यवसायायिक कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करू शकते.
बँकेतून कर्ज घेताना अर्जदाराचे वय 21 ते 65 वर्षे यादरम्यान असावे. अर्जासोबत व्यवसायाचा पुरावा देणे आवश्यक आहे. तसेच व्यवसायाची उलाढाल किती आहे हे देखील दाखवावे लागते. सर्व कागदपत्रे बँकेत जमा केल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होते. या पडताळणीत तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल तर 20 ते 45 दिवसात कर्ज मिळू शकते. जर तुम्ही याआधी काही कर्ज घेतलं असेल आणि त्याचे हफ्ते वेळेवर भरले नसतील किंवा चेक बाउंस झाला असेल तर भविष्यात कर्ज मिळणे कठीण होते. तसेच कर्जाची रक्कम ही संबंधित व्यक्तीचे उत्पन्न आणि ईएमआय परतफेडीच्या आधारे दिली जाते. शक्यतो व्यवसायिक कर्जाचा व्याजदर 11 ते 16.50 टक्के यादरम्यान असतो. प्रत्येक बँकेचे व्याजदर वेगवेगळे असू शकतात.
बँकेतून कर्ज घेताना लागणारी आवश्यक कागदपत्रे
- ओळखीचा पुरावा - आधार कार्ड,पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र
- पत्त्याचा पुरावा
- उत्पन्न पुरावा
- 12 महिन्याचे सर्व बँक खात्यांचे स्टेटमेंट (pdf )
- 2 वर्षाचे आयकर परतावे
- दुकाने आणि आस्थापने परवाना (गुमास्ता)
- जीएसटी नोंदणी पावती
- जीएसटी पावती/चलन
सरकारद्वारे राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजना
- मुद्रा लोन योजना
- प्रधानमंत्री रोजगार योजना
- स्टार्टअप इंडिया
बॅंका कर्ज देताना वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क ग्राहकांकडून घेते. या शुल्काची रक्कम बॅंकेनुसार वेगवेगळी असू शकते. त्यामुळे व्यावसायिक कर्ज घेण्यापूर्वी किमान 3-4 बॅंकांमध्ये व्याजदर, सेवा शुल्क याची चौकशी करून कर्जासाठी योग्य बॅंकेची निवड करावी.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            