आजकालच्या युगात पती-पत्नी दोघेही नोकरी अथवा एखादा व्यवसाय करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्याला आपले आयुष्य ऐशोआरामात घालवता यावे, सर्व सुखसोयींचा लाभ घेता यावा असे सगळ्यांनाच वाटत असते. त्यामुळे दिवसातील अनेक तास मेहनत करण्याची आजकालच्या पिढीची तयारी असते. पण आपल्या उत्पन्नातील काही टक्के रक्कम बचत करावी हे अनेकजण विसरून जातात. खरे तर पती-पत्नीने आपल्या मासिक उत्पन्नाचा आणि खर्चाचा संपूर्ण विचार करून आपण किती बचत करू शकतो हे ठरवणे गरजेचे आहे.
संवाद
आजकाल पती-पत्नी त्यांच्या कामात प्रचंड व्यग्र असतात. काही वेळा तर सुट्टीच्या दिवशी देखील त्यांना काम करावे लागते. त्यामुळे काम नसेल तर लोक आराम करणे पसंत करतात अथवा फिरायला जातात. पती-पत्नीमध्ये अनेकवेळा विविध गोष्टींवरून चर्चा होतो. पण आर्थिक नियोजनाविषयी त्यांच्यात खूपच कमी संवाद होत असल्याचे अनेक जोडप्यांचे म्हणणे आहे. खरे तर आपले एकूण उत्पन्न काय, आपला दोघांचा वैयक्तिक खर्च, घराचा खर्च काय आहे, आपण कशाप्रकारे बचत करू शकतो याविषयी दोघांनी चर्चा करणे गरजेचे आहे.
आर्थिक बाबींबाबत चर्चा कशी करायची असा अनेकांना प्रश्न पडतो. दोघांना मोकळा वेळ असेल तर दोघांनी याबाबत चर्चा जरूर करावी. तसेच आपल्याला नवीन काय घ्यायचे आहे का? कुठे फिरायला जायचे आहे का? यासाठी पैसे कशाप्रकारे जमवायचे याबाबत देखील दोघांमध्ये संवाद होणे गरजेचे आहे. घराचे बजेट तयार करताना दोघांचे एकमत होणे गरजेचे आहे. आपले खर्च एका कागदावर लिहून घ्यावेत आणि त्यातून कशाप्रकारे बचत करता येईल याविषयी चर्चा करावी. कोणतीही चर्चा करताना एकमेकांवर आरोप करू नयेत. कारण अनेकवेळा आर्थिक बाबींवर चर्चा होत असताना आमची भांडणंच होतात असे अनेक जोडपी सांगतात.
आर्थिक नियोजन
घराचे बजेट बनवून झाल्यानंतर योग्यप्रकारे त्याची अंमलबजावणी होते आहे का यावर दोघांनी लक्ष ठेवणेे गरजेचे आहे. तसेच दोघांपैकी बिलं कोण भरणार, घरातील इतर खर्चांकडे लक्ष कोण देणार हे ठरवावे. दोघांपैकी एकाने पुढाकार घेऊन आर्थिक नियोजन योग्यप्रकारे होते का याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच बजेटची अंमलबजावणी होत नसल्यास ती का होत नाही याचा विचार करणे गरजेचे आहे. दोघांनी देखील प्रयत्न करून बचत होतच नाहीये असे वाटत असल्यास तुम्ही आर्थिक सल्लागाराचा सल्ला देखील घेऊ शकता.
आर्थिक बजेट बनवताना केवळ वर्तमानाचा नव्हे तर भविष्याचा विचार करावा. आयुष्यात कोणते संकट कधी येईल याचा आपण अंदाज लावू शकत नाही. त्यामुळे पती-पत्नीने आरोग्य विमा आणि जीवन विमा उतरवणे आवश्यक आहे. जीवन विमा उतरवताना आपण घरासाठी, खाजगी, गाडीसाठी कर्ज घेतले असल्यास तितक्या रक्कमेपेक्षा अधिक पैशाचा विमा उतरवा. त्यामुळे तुमच्या निधनानंतर तुमच्या कुटुंबियांना कर्ज फेडण्याचे टेन्शन राहाणार नाही.