Sports Event Advertising: उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी कंपन्यांकडे विविध पर्याय असतात. यातील पारंपरिक पर्याय म्हणजे न्यूज पेपर, मॅग्झिन, पत्रके आणि टीव्ही अॅड्स इ. क्रिकेट, फिफा स्पर्धा, टेनिस, ऑलम्पिकसारख्या स्पोर्ट्स इव्हेंटमधून उत्पादनांची जाहिरात फार पूर्वीपासून होत आली आहे. भारतामध्ये क्रिकेट प्रचंड लोकप्रिय आहे. विविध क्रिकेट टुर्नामेंट, चषक आणि आता सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रिमियर लिगमध्ये ब्रँड्स जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करतात. (Sports Viewership) यातून कंपन्यांना किती फायदा होतो? थेट नफा जरी झाला नाही तरी ब्रँड अवेअरनेस तर वाढतोच.
जास्त लोकांपर्यंत एकाचवेळी पोहचण्याचा प्लॅटफॉर्म म्हणून बड्या कंपन्या क्रीडा स्पर्धांकडे पाहतात. भारतामध्ये क्रिकेट मॅचेस कोट्यवधी लोक पाहतात. त्यांच्यापर्यंत सामन्यांच्यावेळी जाहिरात करून कंपन्यांना सहज पोहचता येते. जर जाहिरातदारांनी स्पोर्टस् इव्हेंटला प्रमोट केले नाही तर कदाचित एवढे मोठे इव्हेंट आयोजित करणे शक्यही होणार नाही. कारण स्पर्धांसाठी स्पॉन्सर्स कोट्यवधी रुपये लावतात.
तसेच प्रत्येक क्रीडा प्रकारानुसार अभिनव (क्रिएटिव्ह) पद्धतीने जाहिरात गेली जाते. उत्पादने, वस्तू आणि सेवा मैदानावर ठेवल्या जातात. त्यांचा समावेश बक्षिस, कॉमेंट्रीमध्ये केला जातो. युझर एंगेजमेंट गेम्स भरवल्या जातात. सामने पाहणाऱ्या लाखो लोकांच्या नजरेखालून या जाहिराती जातात. बड्या ब्रँड्सलाच अशा जाहिराती करणे शक्य होते. छोटे ब्रँड्स जाहिरातीवर एवढा पैसा खर्च करू शकत नाही.
जिओ मोबाईल सेवा IPL दरम्यान भारतभर पोहचली
रिलायन्स कंपनीने आपली जिओ मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सुविधा 2015 साली लाँच केली. त्यावर्षी आणि त्यानंतरही पुढील काही वर्ष जिओने IPL सामन्यांतून जोरदार जाहिरातबाजी केली केली. जिओ धंधनाधन ही जाहिरात बड्या सेलिब्रिटींना घेऊन केलेली तुम्हाला आठवतच असेल. भारतातील प्रसिद्ध क्रिकेट खेळाडूंशीही जिओने करार केला होता. या जाहिरातीचा जिओला मोठा फायदा झाला होता.
भारतामध्ये जिओ IPL मधून घराघरात पोहचली. तसेच विविध ऑटो कंपन्या आपल्या नवीन गाड्यांची मॉडेल्सही मैदानावर ठेवतात. यावर्षी टाटाने आपली टियागो EV कार IPL च्या बारा मैदानांवर डिस्प्ले केली आहे. यासाठी टाटाने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. सोबतच सामन्यात टीव्ही अॅड सुरूच आहे.
12 एप्रिलच्या IPL सामन्याला 2 कोटींपेक्षा जास्त प्रेक्षक
नुकतेच 12 एप्रिलला झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना 2 कोटी 20 लाख प्रेक्षकांनी ऑनलाइन पाहिला. मैदानातील प्रेक्षकांची संख्या वेगळी. (Sports Event Advertising) तसेच इतर वेबसाइट आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरून मॅचचा अपडेट मिळवणारे प्रेक्षक वेगळे. भारतामधील आयपीएलची क्रेझ या आकडेवारीतून दिसते.
बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल ऑफ इंडिया (BCCI) 2023-27 पर्यंत प्रक्षेपणाचे हक्क 48,390 कोटींना विकणार आहे. ज्या ब्राडकास्ट कंपन्या हे हक्क विकत घेतील ते जाहिरातदारांकडून पैसे वसूल करतील. यावर्षी डिज्ने स्टारने टेलिव्हिजनवरून IPL चे सामने दाखवण्याचे हक्क 23,575 कोटींना मिळवले. तर रिलायन्सच्या मालकीच्या Viacom-18 ने 20,500 कोटींना डिजिटल प्रसारणाचे हक्क विकत घेतले.
डिजिटल Vs टीव्ही
भारतामध्ये डिजिटल मीडियाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. इंटरनेट टेक्नॉलॉजीच्या विकासामुळे आता 5G सुद्धा अनेक शहरांत उपलब्ध झाले आहे. त्यामुळे पारंपरिक टीव्ही माध्यमापेक्षा डिजिटलला महत्त्व आले आहे. प्रेक्षक मोबाईलवरून किंवा इंटरनेट कनेक्शन असलेल्या टीव्ही किंवा इतर डिव्हाइसवरून आपल्या सोईनुसार खेळाचे सामने पाहणे पसंत करतात. तसेच बजेटचा जर विचार केला तर टीव्हीवर जाहिरात दाखवायची असेल तर कंपन्यांना कोट्यवधीत बजेट लागते. मात्र, डिजिटल प्लॅटफॉर्मवर काही लाखांतही जाहिरात करता येऊ शकते.
स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये जाहिरात कशी केली जाते?
जाहिरात कंपन्या स्पोर्ट्स इव्हेटमध्ये टीव्ही कमर्शिअल किंवा डिजिटल माध्यमांवर पॉपअप जाहिराती देतात. सोबतच कॉमेंट्रीमध्ये ब्रँडचे नाव घेणे, मैदानावर स्पेशल सेक्शन करून जाहिरात करणे. उदाहरणार्थ, सध्या सुरू असलेल्या IPL मॅचेसमध्ये Tata neu या ऑनलाइन ब्रँड्साठी स्पेशल फॅनबॉक्स उभारण्यात आला आहे. (Advertising In IPL) तर Dream11 वरील विजेत्यांसाठी स्पेशल फॅन कॉर्नर तयार करण्यात आला आहे. नुकतेच विराट कोहलीला एका कंपनीची इलेक्ट्रिक कार बक्षीस मिळाली. मात्र, हा सुद्धा एक जाहिरातीचाच प्रकार आहे.
खेळाडूंचे कपडे आणि अॅक्सेसरीजवरील जाहिराती
तुम्ही क्रीडा सामन्यांमध्ये लक्षपूर्वक पाहिले तर अनेक ठिकाणी तुम्हाला जाहिराती दिसतील. खेळाडूंच्या कंपड्यावरही विविध ब्रँड्सचे लोगो आणि टॅगलाईन प्रिंट केलेल्या असतात. त्याचे हक्क विकत घेण्यासाठी कंपन्या कोट्यवधी रुपये खर्च करतात. शर्टच्या पुढील बाजूने मोठ्या अक्षरात ब्रँड नेम लिहायचे असेल तर त्यासाठी जास्त पैसे, टोपीवर छोट्या अक्षरात जाहिरात करायची असेल तर त्यासाठी कमी पैसे असे विविध कॅटेगरीमध्ये जाहिरातीचे पर्याय आहेत.
खेळाडू कोणत्या कंपनीची शीतपेये पितात, ते सुद्धा ठरलेले असते. कमर्शियल ब्रेकमध्ये काही ठराविक कंपन्यांच्याच जाहिराती पाहायला मिळतात. या टीव्ही जाहिरातींसाठी कंपन्या कोट्यवधी रुपये खर्च करतात. बऱ्याच वेळा स्पोर्ट्स इव्हेंटला मुख्य एक किंवा दोन स्पॉन्सर्स असतात आणि इतर छोटेमोठे शेकडो स्पॉनर्स असतात. ज्यांची नावे तुम्हाला बक्षीस वितरणावेळी मागे बोर्डवर दिसलेच असतील.