विम्बल्डनची टेनिस स्पर्धा म्हणजे क्रिकेटनंतर गोऱ्या इंग्रज साहेबांची मिजास दाखवणारा दिमाखदार सोहळा. खेळाचे मैदान म्हणजे सुंदर छाटणी केलेलं हिरवळ कोर्ट, शिस्तीत उभे असलेले बॉल-बॉईज आणि गर्ल्स, बियर, शॅम्पेन, क्रीम आणि स्ट्रॉबेरी यांचा आस्वाद घेत खेळाडुंना प्रोत्साहन व दाद देणारे रसिक प्रेक्षक. ही विम्बल्डन टेनिस स्पर्धेची खासियत आहे.
सोमवारपासून (दि. 27 जून) टेनिस विश्वातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी अशी विम्बल्डन टेनिस स्पर्धा 2022 (Wimbledon Tennis Championship 2022) सुरू होत आहे. ही स्पर्धा सुमारे 140 वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे. या स्पर्धेने अनेक वैशिष्ट्ये वर्षानुवर्षे जपली आहेत. ही स्पर्धा काही जणांसाठी पर्वणीच असते. इतक्या वर्षांच्या परंपरेबरोबरच या स्पर्धेने स्ट्रॉबेरी आणि क्रीम याची परंपराही सांभाळली आहे. मॅच पाहायला आलेला प्रत्येक प्रेक्षक स्ट्रॉबेरी आणि क्रीमचा आस्वाद घेतल्याशिवाय जातच नाही.
विम्बल्डनमध्ये लोक स्ट्रॉबेरी आणि क्रीम का खातात?
विम्बल्डनमध्ये स्ट्रॉबेरी आणि क्रीम खाण्याची परंपरा 1877 पासून आजतागायत सुरू आहे. याबाबत अनेक अख्यायिका सांगतिल्या जातात. काही जाणकरांच्या मते स्ट्रॉबेरीच्या पिकाचं उत्पादन आणि टेनिस स्पर्धेचा मौसम या लंडनमध्ये उन्हाळा सुरू होण्याचा संकेत देतात. तर काहींच्या मते, विम्बल्डन स्पर्धा सुरू झाली तेव्हा क्रीम आणि स्ट्रॅबेरी खाण्याची फॅशन होती. ती विम्बल्डन स्पर्धेत पोहोचली आणि ती या स्पर्धेचा एक भाग बनली. तर काही जण असं मानतात की, पाचव्या किंग जॉर्जने टेनिस कोर्टच्या बाहेर प्रेक्षकांसाठी स्ट्रॉबेरीज आणि क्रीम यांचा प्रथमच परिचय करून दिला होता. त्यानंतर तो लोकप्रिय झाला. अशा अनेक कथा स्ट्रॉबेरी आणि क्रीमबाबत सांगितल्या जातात. पण यातील महत्त्वाचा भाग म्हणजे आजही या स्पर्धेत स्ट्रॉबेरी आणि क्रीमचं महत्त्व किंचितही कमी झालेलं नाही.
स्ट्रॉबेरी आणि क्रीमची किंमत किती?
विम्बल्डन स्पर्धेच्या संकेतस्थळावर दिल्याप्रमाणे, इथे विकल्या जाणाऱ्या स्ट्रॉबेरी आणि क्रीमच्या एका पॅक किंमत 2010 पासून तेवढीच आहे. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 10 स्ट्रॉबेरी आणि क्रीम असलेल्या एका पॅकची किंमत 2.50 युरो (206 रूपये) इतकी आहे. विम्बल्डनच्या हिरवळी मांडण्यात आलेली स्ट्रॉबेरी ही 1 नंबरची स्ट्रॉबेरी असते. असं म्हटलं जातं की, पहाटे 4 वाजता ती फ्रेश तोडून इथे आणली जाते. विम्बल्डन चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत स्ट्रॉबेरी आणि क्रीमचे सरासरी सर्वाधिक 190,900 पॅक विकले गेले आहेत!
विम्बल्डन स्पर्धा पाहण्यासाठी गेलेल्यांना स्ट्रॉबेरी आणि क्रीम खाल्ल्याशिवाय ही स्पर्धा पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. इतक्या वर्षानंतर ही परंपरा कायम ठेवणाऱ्या स्पर्धेचे आणि रसिक प्रेक्षकांचे नाते काही औरच आहे.