Financial Planning after Retirement: निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी पैशांचे नियोजन करताना महागाईचा दर विचारात घेतला नाही तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. कारण, भाववाढीने फक्त वस्तू आणि सेवांच्या किंमतीच वाढतात असे नव्हे तर पैशाचे मूल्यही कमी होते. अनेकजण गुंतवणूक करताना महागाईचा दर विचारात घेत नाहीत. मागील काही वर्षात महागाईचा भस्मासुर सर्वसामान्य नागरिकांच्या डोक्यावर बसला आहे.
मागील आर्थिक वर्षात किरकोळ महागाई दर 7 टक्क्यांजवळ पोहचला होता. आता कुठे महागाई नियंत्रणात आली आहे. मात्र, दीर्घकाळाचा विचार करता कोरोनासारखी इतर संकटं भविष्यात पुन्हा उभे राहतील आणि महागाईचा भडका उडू शकतो. त्यामुळे आर्थिक नियोजन करताना वस्तू सेवांच्या वाढत्या किंमती आणि गुंतवणुकीवरील परतावा किती मिळेल, याचा अंदाज बांधायला हवा.
भाववाढ म्हणजे काय? (What is Inflation?)
बाजारात उपलब्ध असलेल्या वस्तू आणि सेवांचे दर वाढणे यास सर्वसामान्यपणे भाववाढ म्हटले जाते. मागणी आणि पुरवठ्यावर भाववाढ अवलंबून असते. भाववाढ होते तसे पैशांचे मूल्य कमी होत जाते. उदाहरणार्थ, मागील वर्षी एखादी वस्तू जर तुम्ही 100 रुपयांना घेऊ शकत होतो तर यावर्षी तीच वस्तू घेण्यास तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील. भाववाढ होण्यामागे इतरही अनेक कारणे आहेत, पण एक प्रमुख कारण म्हणजे, सरकार नवा पैसा छापून बाजारात आणते, तसेच पायाभूत सुविधा आणि पगारावरील खर्च वाढवते. त्यामुळे पैशाचे मूल्य कमी होते. थोडक्यात भाववाढ म्हणजे पैशाची खरेदीक्षमता कमी होते.
भाववाढ आर्थिक नियोजनावर कसा परिणाम करते?
भाववाढीचा दीर्घकालीन आर्थिक नियोजनावर परिणाम होतो. यामध्ये निवृत्तीनंतर केलेल्या गुंतवणुकीचा परतावा, मुलांचे शिक्षण, लग्न किंवा इतर मोठ्या बाबींवर तुम्ही किती खर्च करू शकता यावरही होतो. हे एका उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊ.
XYZ ही व्यक्ती 2020 साली खासगी कंपनीतून वरिष्ठ पदावरून निवृत्त झाली. त्या व्यक्तीने नोकरी करत असताना पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF) आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) मध्ये गुंतवणूक केली. सोबतच जीवन विमा आणि आरोग्य विमा पॉलिसीही आहेत. त्या व्यक्तीचा निवृत्तीनंतरचा मासिक खर्च 40 हजार रुपये असून निवृत्तीनंतर बचत आणि गुंतवणूक मिळून सुमारे 80 लाख रुपये राशी जवळ आहे. ही सर्व राशी त्या व्यक्तीने मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करायचे ठरवले. त्यासाठी ठेवीवरील वार्षिक व्याजदर 8% समजू. तसेच महागाईचा दरही 8% गृहित धरू.
मासिक खर्च 40 हजार रुपये महिना म्हणजे वार्षिक खर्च 4 लाख 80 हजार रुपये झाले. तसेच मुदत ठेवीतून वार्षिक व्याजापोटी 6 लाख 40 हजार रुपये येतील. पुढील 10 वर्षात या व्यक्तीचा खर्चाचा आलेख कसा राहील हे पाहू.
वरील आकडेवारीतून असे दिसते की, पाचव्या वर्षापासून शिल्लक रक्कम वजा होत गेली. म्हणजेच, परताव्यापेक्षा मासिक खर्च जास्त झाला. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला गुंतवणूक काढून पैसे खर्च करण्याची वेळ येऊ शकते. गुंतवणूक करताना भाववाढ विचारात न घेतल्याने अशी अडचण तुमच्यावरही येऊ शकते. निवृत्तीनंतर व्यक्तीची जोखीम घेण्याची क्षमताही कमी असते. त्यामुळे एफडीमधील गुंतवणूक सुरक्षित जरी असली तर जास्त आकर्षक ठरत नाही. त्यामुळे गुंतवणुकीत वैविध्य असावे. तसेच जोखीम क्षमता ध्यानात घेऊन गुंतवणूक करावी.
अल्पकालीन गुंतवणूक करताना भाववाढीचा परिणाम शुल्लक ठरतो. त्यामुळे त्याकडे लक्ष जात नाही. मात्र, दीर्घकाळात भाववाढीचा किती नकारात्मक परिणाम होतो हे तुमच्या लक्षात आले असेल.