• 03 Oct, 2022 23:36

ड्रोन तंत्रज्ञानाचा शेतीत कसा वापर होतो?

farming

शेती व्यवसयात किटकनाशक फवारणी, जमिनीच्या नोंदींचे दस्तऐवजीकरण, भाजीपाला, मासे, फळे शेतातून थेट बाजारपेठेत घेऊ जाण्यासाठी ड्रोनचा उपयोग करता येऊ शकतो.

तंत्रज्ञानात होत असलेल्या बदलांमुळे शेती क्षेत्रावर त्याचा परिणाम दिसू लागला आहे. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून आजचा शेतकरी कमी श्रमात जास्त उत्पादन कसे निघेल याकडे जास्त भर देत आहे.  या आधुनिक तंत्रज्ञानात अग्रस्थानी आहे ते ड्रोन तंत्रज्ञान. ड्रोनचा शेतीत वापर करून शेतकरी औषध फवारणी करू शकतो. ड्रोनची शेतातील कामाची गरज पाहता शेती क्षेत्रातील ड्रोनचा वापर वाढवण्यासाठी यावर केंद्र सरकारने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. केंद्र सरकारने शेतीमध्ये ड्रोन वापरायला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र निधीची तरतूद केली आहे. शेतीमध्ये भूमीअभिलेखाच्या नोंदी, खते, कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोनच्या वापरला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.

 

शेती व्यवसायात ड्रोन वापरायचे फायदे 

 • हवामानात अचानक होणाऱ्या बदलामुळे शेतमालाचे नुकसान कमी करण्यात मदत होते.
 • पिकांवर फवारणी करता येते 
 • जिओ फेन्सिंग 
 • पिकाचे निरीक्षण करता येते
 • लागवड करता येते
 • जमिनीचे निरीक्षण होते
 • पशुधन व्यवसायावर निरीक्षण ठेवता येते
 • पिकांची तपासणी करता येते
 • रसायनांचा अतिरिक्त वापर टाळता येतो.

 

केंद्राच्या धोरणातील बदल 

कृषी संशोधनासाठी ड्रोनचा वापर करता यावा यासाठी ईक्रीस्ट संस्थेला 16 नोव्हेंबर 2020 रोजी परवानगी मिळाली. यातून शेतीसाठी ड्रोन वापरायला चालना मिळेल, असे केंद्र सरकारने सांगितले आहे. शेती व्यवस्थापनामध्ये ड्रोनचा वापर वाढवा आणि शेतातील मजुरांचा बोझा कमी व्हावा यासाठी 23 जानेवारी, 2022 रोजी केंद्र सरकारने ड्रोन खरेदीवर 100 टक्के आणि 10 लाख अनुदान जाहीर केले आहे. कृषी अवजारे प्रशिक्षण आणि चाचणी संस्था, भारतीय कृषी संशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्र आणि राज्य कृषी विद्यापीठांना अनुदान देण्यात येणार आहे. ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणीसाठी केंद्राने 26 जानेवारी, 2022 रोजी सुधारित मार्गदर्शक सूचना प्रसारित केल्या आहे.

असे मिळणार अनुदान 

 • संशोधन संस्था, केव्हीके, कृषी विद्यापीठ : 10 लाख 
 • शेतकरी उत्पादक कंपनी : 7 लाख 50 हजार 
 • भाडेतत्वावर ड्रोन घेतल्यास ; हेक्टरी 6 हजार रुपये 
 • सेवा सुविधा केंद्र : 4 लाख 
 • कृषी पदवीधर : 5 लाख

 

ड्रोन वापरासाठी आवश्यक परवानग्या 

देशात ड्रोनच्या वापरासाठी नागरी उड्डयन मंत्रालय आणि नागरी उड्डयन मंत्रालयाच्या महासचिवांची परवानगी घ्यावी लागेल. काही अटीसह ड्रोन नियम 2021 प्रमाणे ड्रोन वापरायला परवानगी मिळेल. ड्रोन चालविणाऱ्या व्यक्तीकडे नागरी उड्डयन मंत्रालयाच्या महासचिवांनी दिलेला युनिक युआयएन नंबर आणि एअरक्राफ्ट ऑपरेटर परमिट असणे आवश्यक आहे. ड्रोनचा वापर करण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाला माहिती देणे आवश्यक आहे. सर्व सुरक्षाविषयक सुचानाचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र ड्रोन द्वारे कीटकनाशक फवारणी करताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. ड्रोन उडविण्याची परवानगी, फवारणीचे अंतर, वजनाचे वितरण, अंतराची मर्यादा, ड्रोनची नोंदणी पायालटचे सर्टीफिकेशन आदि काळजी घ्यावी लागते.

 

ड्रोन वापरामुळे शेतकऱ्यांना होणारा फायदा 

 • प्रशिक्षण पायलटच्या माध्यमातून ड्रोनचा वापर होणार आहे. त्यामुळे ड्रोनचा चुकीचा वापर होण्याची शक्यता नाही.
 • ड्रोनच्या वापरातून कामास विलंब होत नाही. ड्रोनद्वारे मजुराच्या तुलनेत दुप्पट काम होऊ शकते.
 • पारंपारिक फवारणी पद्धतीच्या तुलनेत ड्रोनच्या माध्यमातून होणाऱ्या फवारणीत अपव्यय कमी होतो. यामुळे आणि आणि खाते, कीटकनाशकाची बचत होते.
 • ड्रोन जास्त काळ चालतो. खर्च कमी येतो, तसेच व्यवस्थापन खर्च कमी येतो.
 • ड्रोनमध्ये काढता येणारी टाकी, कमी खर्चाचा साचा आणि कीटकनाशकांच्या योग्य फवारणीची सुविधा.

थोडं खर्चिक असलं तरी ड्रोनचा वापर करून शेतकरी आपल्या उत्पादन वाढ करू शकता.