इंजिनातल्या या समस्येमुळे तेल गळती होऊ शकते आणि आगीचा धोकाही निर्माण होऊ शकतो. ही बदली प्रक्रिया 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे. संपूर्ण भारतातल्या सर्व बिगविंग (BigWing) डीलरशिपवर ही प्रक्रिया केली जाईल, असं होंडा कंपनीनं सांगितलंय. इंजिनच्या उजव्या क्रॅंककेस कव्हरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग बिघाड आहे. यामुळे सुमारे 2,000 CB300R बाइक युनिट्स परत मागवण्यात येत आहेत. ऐच्छिक रिकॉलमध्ये CB300R च्या 2022 मॉडेलचा समावेश आहे.
Table of contents [Show]
उजव्या क्रॅंककेस कव्हरचं सदोष उत्पादन
इंजिनच्या उजव्या क्रॅंककेस कव्हरच्या सदोष उत्पादन प्रक्रियेमुळे, इंजिनच्या उष्णतेमुळे कमी धारणा शक्तीमुळे सील प्लग डिस्लोजिंग होण्याची शक्यता आहे. यामुळे सीलिंग प्लग बंद पडू शकतो आणि इंजिन ऑइल बाहेर पडू शकतं, असं होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. यापेक्षाही धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते. मोटरसायकलच्या गरम भागांना चिकटलेल्या तेलामुळे आगदेखील लागू शकते. टायर्सशी त्याचा संपर्क होऊ शकतो किंवा गरम तापमानामुळे रायडरला (चालक) इजा होऊ शकते, असं कंपनीनं म्हटलं आहे.
बदली प्रक्रिया विनामूल्य
सावधगिरीचा उपाय म्हणून 15 एप्रिल 2023पासून संपूर्ण भारतातल्या बिगविंग डीलरशिपवर या सदोष भागांची बदली केली जाईल. वाहन वॉरंटीमध्ये आहे की नाही, हे सध्या विचारात घेतलं जाणार नाही. त्यामुळे ही बदली प्रक्रिया विनामूल्य केली जाईल, असं कंपनीनं नमूद केलंय. कंपनी आपल्या बिगविंग डीलर्सद्वारे शुक्रवारपासून ग्राहकांना त्यांच्या वाहनाच्या तपासणीसाठी कॉल, ईमेल, एसएमएसद्वारे सूचित करणार आहे, असं निवेदनात म्हटलंय.
निओ स्पोर्ट्स बाइक
होंडा बिगविंगवर ही बाइक निओ स्पोर्ट्स कॅफे म्हणून सादर केली गेलीय. 286.01 सीसीचं इंजिन या बाइकला बसवण्यात आलंय. तर लिक्विड कूल्ड, फोर स्ट्रोक, एसआय, बीएस-व्हीआय प्रकारचं हे इंजिन आहे. 22.9kW@9000 आरपीएम आउटपूट असून मॅक्स टॉर्क 27.5 M-m @ 7500 आरपीएम आहे. पीजीएम-एफआयची फ्यूएल सिस्टम आहे. तर सेल्फ स्टार्टची सुविधा या बाइकमध्ये देण्यात आलीय. राउंडेड हेड लाइट, फुल एलसीडी मल्टी फंक्शन मीटर उपलब्ध आहे. पर्ल स्पार्टन रेड आणि मॅट स्टील ब्लॅक अशा दोन रंगांत ही बाइक पाहायला मिळते. महाराष्ट्रातल्या विविध शहरांत या बाइकची किंमत वेगवेगळी आहे. मात्र सरासरी विचार केल्यास CB300R 2,77,267 इतकी शो-रूम किंमत (पुणे) पाहायला मिळते.
आगाऊ बुकिंग करण्याचा सल्ला
इंजिनातल्या या बिघाडामुळे संभाव्य धोका लक्षात घेता कंपनीनं या बाइकचे तब्बल 2000 युनिट्स परत मागवलेत. वॉरंटीमध्ये नसलेल्यांकडूनदेखील कोणतंही शुल्क न आकारता सेवा दिली जाणार आहे. ग्राहकांचा कंपनीवरचा विश्वास अधिक दृढ होण्याच्या हेतूनं ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येतेय. दरम्यान, डीलरशिपवर कोणतीही गैरसोय होऊ नये किंवा प्रतीक्षा वेळ टाळण्यासाठी अपॉइंटमेंट आगाऊ बुक करावी, असा सल्ला कंपनीनं आपल्या ग्राहकांना दिला आहे.