मुंबईसह देशभरात नाश्त्यासाठी पाव खाणारे लोक बरेच आहेत. महाराष्ट्रात मिसळ पाव, वडापाव, ओम्लेट पाव,पाव भाजी मोठ्या चवीने खाणारे लोक अधिक प्रमाणात आहेत. मात्र येत्या काही दिवसांत पावाचे भाव वाढणार असल्याची बातमी आली आहे. पावाचे भाव वाढणार असल्याकारणाने वडापाव आणि मिसळ पावाचे भाव देखील वाढणार आहे.
पाव बनविण्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल महाग झाल्यामुळे पावाच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्याचे कारण बेकर्स असोसिएशनने दिले आहे. काल नवी मुंबई येथे बेकर्स असोसिएशनची बैठक पार पडली. या बैठकीत पावाच्या किमतीत एक रुपयाने वाढ करण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेतला आहे. वाढत्या महागाईमुळे गहू, गव्हाचे पीठ, मैदा यांच्या किमतीत वाढ झाली आहे. सामान्य लोकांच्या आहारात असलेले खाद्यपदार्थ महाग झाल्यामुळे याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या आर्थिक नियोजनावर होणार आहे. कच्चा माल महाग झाल्यामुळे पाव आणि इतर बेकरी उत्पादने बनविण्यासाठी अधिक खर्च होत असल्याचे बेकर्स असोसिएशनने म्हटले आहे.
कोविड संसर्गाच्या कालावधीत शासनाने बेकरी व्यापाऱ्यांना स्वच्छतेबाबतच्या काही सुचना केल्या होत्या. बेकरीमध्ये नियमित स्वच्छता असावी आणि पावाची लादी प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये बंदिस्त करूनच विकण्याचे निर्देश बेकरी व्यावसायिकांना देण्यात आले होते. प्लास्टिक वेष्टनाचा खर्च देखील परवडत नसल्याने गेले वर्षभर उत्पादक तोट्यात होते अशी माहिती देखील बेकरी व्यावसायिकांनी दिली आहे.अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर गोवर्धन दुध आणि अमूल दूध कंपन्यांनी देखील गाईच्या आणि म्हशीच्या दूध दरात वाढ केली आहे. त्यात पावाची देखील भाववाढ होणार आहे. याचा सरळसरळ आर्थिक भार सामन्यांच्या खिशावर पडणार आहे.
पाव महागण्याची शक्यता असल्याने मिसळ पाव, वडापाव, ओम्लेट पाव,पाव भाजी खातांना ग्राहकांना आता पैशाचा विचार करावा लागणार आहे. या दरवाढीमुळे साधारणपणे 14 ते 15 रुपयांना मिळत असलेला वडापाव आता 18 ते 20 रुपयांना मिळू शकतो. मैद्याच्या किमतीत होत असलेली भाववाढ, तसेच बेकरीसाठी आवश्यक असलेले सामान देखील महागले आहे. पेट्रोल आणि डीझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे वाहतूक खर्च देखील महागला आहे.