देशाल इलेक्ट्रिक व्हेईकलला ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहता हिरो मोटोर्सने या क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. इलेक्ट्रिक व्हेइकल बाजारपेठेत स्थान बळकट करण्याबाबत हिरो मोटर्सने 1500 कोटींची गुंतवणूक करण्याचे नियोजन केले आहे. कंपनीकडून जीईएफ कॅपिटल पार्टनर्सकडून कंपनी निधी उभारणार आहे.
जागतिक पातळीवर कार्बन उत्सर्जन कमी करण्याबाबत शाश्वत प्रयत्न करण्यात येत आहे. अनेक देशांनी पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक मोबिलिटीचा पर्याय स्वीकारला आहे. मागील तीन वर्षात भारतात देखील इलेक्ट्रिक व्हेईकलच्या वापरात वाढ झाली आहे. विजेवर चालणाऱ्या कार आणि मोटारसायकल ग्राहकांमध्ये लोकप्रिय होत आहेत. त्यामुळे अनेक कंपन्यांनी या श्रेणीत विस्ताराला प्राधान्य दिले आहे. हिरो मोटोर्सकडून भारतात आणि थायलंडमध्ये इलेक्ट्रिक बाइक निर्मितीचा प्रकल्प सुरु केला जाणार आहे.
हिरोकडून इलेक्ट्रिक मोटारी आणि मोटारसायकलींसाठी आवश्यक सुटे भाग आणि त्यांच्या संशोधनासाठी गुंतवणूक केली जाणार आहे. इलेक्ट्रिक मोटारींची निर्मिती करणाऱ्या बीएमडब्लू, एएमजी सारख्या बड्या कंपन्यांना हिरोकडून
सुटे भाग , ईव्ही गिअरबॉक्स पुरवठा सुरु केला असल्याचे कंपनीचे अध्यक्ष पंकज मुंजाल यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. इलेक्ट्रिक मोटारींसाठी आवश्यक स्पेअर पार्ट्ससाठी जागतिक पातळीवरुन प्रचंड मागणी आहे. अ्मेरिका आणि युरोपात या उत्पादनांची मागणी पूर्ण करण्यासाठी हिरो मोटर्सने या क्षेत्रात गुंतवणूक आणि संशोधनाला प्राधान्य दिले असल्याचे मुंजाळ यांनी सांगितले. इलेक्ट्रिक गिअरबॉक्सचा विचार केला तर वर्षाला या उत्पादनाची उलाढाल जवळपास 16000 कोटी रुपयांच्या आसपास वाढेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारात स्थान बळकट झाल्याने हिरो मोटर्सचा एकूण टर्नओव्हर दुप्पट होण्याची शक्यता आहे. पुढील तीन वर्षात 5500 कोटींची उलाढाल होणार आहे. कंपनी खुल्या बाजारातून भांडवल उभारण्यासाठी आयपीओचा देखील विचार करेल, असे मुंजाळ यांनी सांगितले.