हिरो मोटोकॉर्पनं (Hero MotoCorp) जवळपास दीड टक्क्यांनी (1.5) दुचाकींच्या किंमतीत वाढ केली आहे. नुकतीच याची घोषणादेखील करण्यात आली. कंपनीनं या किंमती वाढवण्यामागे विविध कारणं दिली आहेत. इनपुट कॉस्टमधली वाढ हे कंपनीनं दिलेलं प्रमुख कारण आहे. या किंमतीच्या वाढीसह कंपनीनं 2023 या वर्षात ही दुसऱ्यांदा वाढ केली आहे. याआधी कंपनीनं एप्रिलमध्ये जवळपास 2 टक्क्यांनी वाहनांच्या किंमती वाढवल्या होत्या.
मॉडेल अन् बाजारावर आधारित किंमती निश्चिती
कंपनीनं म्हटलं, की विविध मॉडेल्स आणि मार्केटच्या आधारे सध्या आम्ही किंमती निश्चित केल्या आहेत. मोटारसायकल आणि स्कूटरच्या किंमतीत झालेली वाढ हा कंपनीकडून वेळोवेळी केलेल्या किंमतीच्या रिव्ह्यूचा एक भाग आहे. किंमतीची परिस्थिती, उत्पादन खर्च आणि व्यावसायिक गरजा अशा विविध बाबी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्वांचा ग्राहकांवर होणारा परिणाम कमी करण्याच्या दृष्टीकोनातून फायनान्ससाठी नवा कार्यक्रम जारी करण्यात येईल, असं कंपनीतर्फे सांगण्यात आलंय.
विक्रीत 6.7 टक्क्यांनी वाढ
देशाच्या बहुतांश भागात पाऊस आहे. आर्थिक निर्देशकही चांगल्या स्थितीत आहे. यामुळे मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर आगामी सणासुदीच्या काळात विक्री वाढू शकते. मे 2023मध्ये कंपनीच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 6.7 टक्के वाढ झाली. मे पर्यंत 519,474 गाड्यांची विक्री झाली आहे. तर मार्चमध्ये निवडक मोटारसायकली आणि स्कूटरच्या किंमती दोन टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आल्या होत्या, असं कंपनीनं म्हटलं.
इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत?
हिरो मोटोकॉर्पची फ्लॅगशिप इलेक्ट्रिक स्कूटर विडा व्ही वन प्रोची (Vida V1 Pro) किंमत सुमारे 6,000 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. या नवीन किंमती 1 जुलैपासूनच लागू झाल्या आहेत. या वाढीनंतर, विडा व्ही वन प्रो ही इलेक्ट्रिक स्कूटर आता फेम II (FAME II) सबसिडी आणि पोर्टेबल चार्जरसह 1,45,900 रुपयांना उपलब्ध होणार आहे. फेम II अंतर्गत, 1 जूनपासून सबसिडीतल्या कपातीचा बहुतांश भार कंपनीनंच उचलला.