आपल्या व्यवसायाच्या विस्तारासंदर्भात कंपनीनं माहिती दिलीय. कंपनीचे सीईओ याविषयी म्हणतात, हिरो मोटोकॉर्प चालू आर्थिक वर्षात (2023-24) विक्रमी नवीन मॉडेल्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी निरंजन गुप्ता म्हणाले, की हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) आपला बाजारातला हिस्सा अधिक मजबूत करण्यास इच्छुक आहे. त्यातही विशेषत: प्रीमियम सेगमेंटवर (Premium segment) आम्ही अधिक भर देत आहोत. देशातली सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी (Two wheeler manufacturing company) चालू आर्थिक वर्षात विविध प्रकारांत नव्या कोऱ्या बाइक लॉन्च करणार आहे.
Table of contents [Show]
हार्ले डेव्हिडसनसोबत भागीदारी
हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) या आर्थिक वर्षात हार्ले डेव्हिडसनच्या (Harley-Davidson) सहकार्यानं बाजारात आपली पहिली प्रीमियम बाइक सादर करणार आहे. कंपनी सध्या परवडणाऱ्या बाइक सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे. यात 100cc ते 110cc बाइकचा समावेश होतो. 125cc सेगमेंटमध्ये अधिक मॉडेल्स आणण्याचा तर 160cc आणि त्यानंतरच्या सेगमेंटमध्ये नवे मॉडेल्स लॉन्च करण्याचा कंपनी विचार करत आहे, अशी माहिती देण्यात आलीय. सीईओ निरंजन गुप्ता म्हणाले, की आम्ही चालू आर्थिक वर्षाच्या प्रत्येक तिमाहीत नवं प्रॉडक्ट म्हणजेच बाइक सादर करण्याचा विचार करत आहोत.
आतापर्यंतचे सर्वाधिक प्रॉडक्ट लॉन्च करणार?
या आर्थिक वर्षात आम्ही कंपनीच्या इतिहासातली आतापर्यंतची जास्तीत जास्त नवे मॉडेल्स देऊ शकतो. हिरो मोटोकॉर्पचे सीईओ म्हणाले, की या वर्षी कंपनी विस्तार अधिक वेगानं होईल, असा आम्हाला आशावाद आहे. सर्व विभागांमध्ये कंपनी आपला हिस्सा वाढवण्याची तयारी करत आहे, असंही ते म्हणाले.
बाजार हिस्सा आणि मार्जिन वाढण्याची अपेक्षा
सीईओ निरंजन गुप्ता यांनी अधिकची माहिती देताना सांगितलं, की हिरो मोटोकॉर्पला त्याचा बाजार हिस्सा आणि मार्जिन वाढण्याची अपेक्षा असणार आहे. आम्ही आर्थिक वर्ष 2023-24मध्ये बाजारात अनेक प्रॉडक्ट्स म्हणजेच बाइक लॉन्च करण्याची तयारी करत आहोत. कंपनी आर्थिक वर्ष 2023-24च्या प्रत्येक तिमाहीत एक नवं उत्पादन लॉन्च करेल. प्रीमियम सेगमेंटमध्ये अनेक नवीन मॉडेल्स लॉन्च केली जाणार आहेत. काही मोठी उत्पादनंही सादर करण्यात येणार असल्याचं गुप्ता यांनी सांगितलं. यामुळे कंपनीचा बाजारातला हिस्सा प्रीमियम सेगमेंटमध्ये वाढणार आहे.
150cc ते 450cc रेंजकडे लक्ष केंद्रित
कंपनी 150cc ते 450cc पर्यंतच्या प्रीमियम सेगमेंट बाइक्सवरही लक्ष केंद्रित करत आहे. याआधी हिरो मोटोकॉर्पनं आधीच आपल्या इलेक्ट्रिक को-ब्रँड व्हिडाच्या (Vida) विस्ताराची घोषणा केलीय. चालू कॅलेंडर वर्षात कोब्रँड व्हिडा 100 शहरांमध्ये नेण्याची, विस्तारण्याची कंपनीची योजना आहे.
नुकत्याच वाढवल्यात किंमती
कंपनीनं आपल्या काही दुचाकींच्या किंमती नुकत्याच वाढवल्या आहेत. तर वर्षाच्या सुरुवातीला झूम ही स्पोर्टी स्कूटर (110cc) लॉन्च केली होती. झूम एलएक्स (Xoom LX), झूम व्हीएक्स (Xoom VX), झूम झेडएक्स (Xoom ZX) अशा 3 व्हेरिएंट्समध्ये ती सादर करण्यात आली होती. आता हीच मालिका पुढे सुरू राहणार आहे.