महाराष्ट्र सरकारने मार्च महिन्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सोमवारी (दि. 10 एप्रिल) मोठा दिलासा दिला आहे. मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला होता. राज्य सरकारने अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सोमवारी 177 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीनुसार, छत्रपती संभाजी नगर महसूल विभागाला सर्वाधिक 84.75 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. तर नाशिक विभागाला 63.09 कोटी रुपये, अमरावतीला 24.57 कोटी रुपये आणि पुणे 5.37 कोटी रुपये जाहीर करण्यात आली आहे.
अवकाळी पावसाचा पिकांना फटका
अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांतील 7,400 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा जिल्ह्यात अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यात 7,400 हेक्टरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहे. 3243 हेक्टर जमिनीवरील नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित सर्वेक्षणाचे काम लवकरच पूर्ण केले जाईल. या अवकाळी पावसामुळे किमान 7,596 शेतकरी नुकसानग्रस्त झाले आहेत. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (दि.10 एप्रिल) केली. या घोषित केलेल्या मदतीचा शासन निर्णयही सरकारने प्रसिद्ध केला आहे.
19 मार्चपर्यंत नुकसान झाल्यास भरपाई मिळेल
4 ते 8 मार्च आणि 16 ते 19 मार्च 2023 या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस ही राज्य सरकारने जाहीर केलेली आपत्ती असून पिकांचे नुकसान 33 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी निर्धारित दराने गुंतवणूक अनुदानाच्या स्वरूपात शेतकऱ्यांना मदत दिली जाते. मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यासंदर्भात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सर्व विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्यानुसार राज्य सरकारकडून नुकसान भरपाई करण्यात येईल.