कर्ज पुरवठा क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बिगर बँकिंग वित्त कंपनी हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (HDFC) ने कर्जदारांना जोरदार झटका दिला आहे. कंपनीने किरकोळ कर्जाचा दर 0.35% ने वाढवला आहे. नवीन कर्जदर आज 20 डिसेंबर 2022 पासून लागू झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.
नुकताच रिझर्व्ह बँकेने पतधोरणात रेपो दर 0.35% ने वाढवला होता. त्यानंतर बँका आणि वित्त संस्थांनी व्याजदर वाढीचा भार ग्राहकांवर टाकला आहे. मागील आठवडाभरात प्रमुख बँकांनी कर्जदरात वाढ केली होती. ज्यामुळे कर्जफेड करणाऱ्या ग्राहकांना आता जादा 'ईएमआय'चा भार सोसावा लागणार आहे.
एचडीएफसीने रिटेल प्राईम लेंडिंग रेट अर्थात किरकोळ कर्जाचा व्याजदर (RPLR) 0.35% ने वाढवला आहे.आजच्या व्याजदर वाढीनंतर एचडीएफसीचा गृह कर्जाचा व्याजदर 8.65% इतका झाला आहे. या कर्जदरासाठी ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर किमान 800 असणे आवश्यक आहे. 800 पेक्षा कमी क्रेडिट स्कोअर असणाऱ्या ग्राहकांसाठी गृह कर्जाचा व्याजदर 8.95% ते 9.30% इतका असेल, असे 'एचडीएफसी'ने म्हटले आहे.मे 2022 पासून एचडीएफसीच्या कर्जदरात 2.25% वाढ झाली आहे.
एचडीएफसीचे कर्जदर रिझर्व्ह बँकेच्या बेंचमार्कशी संलग्न आहेत. त्यामुळे मागील काही महिन्यात कंपनीच्या कर्जदारांना झटका बसला आहे. विद्यमान कर्जदारांच्या मासिक हप्त्याची रक्कम वाढली आहे. EMI कमी करण्यासाठी कर्जदार कर्जाची मुदत वाढवू शकतात, असे एचडीएफसीने म्हटले आहे.
SBI आणि ICICI बँकेने देखील वाढवला कर्जदर
गेल्याच आठवड्यात देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने (SBI Hike Lending Rates by 0.35%) कर्जदरात 0.35% वाढ केली होती. एसबीआयचा गृहकर्जाचा दर 8.75% इतका झाला आहे. 750 किंवा त्याहून क्रेडिट स्कोअर असणाऱ्या ग्राहकांना 31 जानेवारी 2023पर्यंत हा विशेष कर्जदराचा लाभ घेता येईल, असे बँकेने म्हटले आहे. त्यानंतर कर्जदर 8.90% इतका वाढणार आहे. खासगी क्षेत्रातील ICICI बँकेने 750 किंवा त्याहून क्रेडिट स्कोअर असणाऱ्या ग्राहकांसाठी 8.75% विशेष गृहकर्जदर जाहीर केला आहे. हा कर्जदर बँकेच्या नियमित कर्जदराच्या तुलनेत 0.20% कमी आहे. येत्या 31 डिसेंबर 2022 पर्यंत 8.75% इतका व्याजदर राहील.