स्वतःचे घर घेताना घेतलेले कर्ज अनेकदा मानसिक ताण वाढवते. कर्जाचा कालावधी जितका मोठा असतो, तितकी जास्त रक्कम आपल्याला व्याजापोटी बँकेला द्यावी लागते.
अनेकदा आपण कर्जाची मूळ रक्कम भरण्यापेक्षा व्याज भरण्यातच जास्त पैसे खर्च करतो. मात्र, योग्य आर्थिक नियोजनाने तुम्ही या व्याजाच्या ओझ्यातून सुटका करून घेऊ शकता आणि लाखांची बचत करू शकता.
18 लाखांच्या बचतीचा सोपा हिशोब
समजा, तुम्ही 50 लाख रुपयांचे कर्ज 8.5 टक्के व्याजदराने 20 वर्षांसाठी घेतले आहे. अशा स्थितीत तुमचा मासिक हप्ता साधारण 43,000 रुपये असतो. सुरुवातीच्या वर्षांमध्ये तुमच्या हप्त्याचा मोठा भाग हा केवळ व्याजापोटी जातो.
जर तुम्ही कर्जाच्या सुरुवातीलाच मूळ रकमेच्या 10 टक्के म्हणजेच साधारण 5 लाख रुपये 'प्रीपेमेंट' म्हणून भरले, तर याचा तुमच्या कर्जाच्या गणितावर मोठा परिणाम होतो. यामुळे तुमच्या एकूण व्याजामध्ये सुमारे 18 लाख रुपयांची थेट कपात होऊ शकते. जेव्हा तुम्ही जादा रक्कम भरता, तेव्हा बँक तुम्हाला दोन पर्याय देते. पहिला हप्ता कमी करणे आणि दुसरा कर्जाची मुदत कमी करणे. जास्त फायदा मिळवण्यासाठी नेहमी कर्जाची मुदत कमी करण्याचा पर्याय निवडावा.
कर्जाचा बोजा हलका करण्याचे 5 प्रभावी मार्ग:
वेळोवेळी प्रीपेमेंट करणे: जेव्हा कधी तुम्हाला कामातून बोनस मिळेल किंवा इतर माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न येईल, तेव्हा ती रक्कम थेट कर्जात भरा. यामुळे मुद्दल कमी होऊन व्याजाचा दर आपोआप कमी होतो.
कर्जाचा कालावधी कमी ठेवणे: कर्ज घेताना ते शक्य तितक्या कमी कालावधीसाठी घेण्याचा प्रयत्न करा. जरी यामुळे हप्ता थोडा वाढला तरी एकूण व्याजामध्ये मोठी बचत होते.
मासिक हप्ता वाढवणे: जर तुमचे पगार किंवा उत्पन्न वाढले असेल, तर दरवर्षी आपल्या हप्त्याची रक्कम 5 ते 10 टक्क्यांनी वाढवा. यामुळे कर्जाची मुदत वेगाने कमी होते.
कमी व्याजदराचा शोध: जर दुसरी एखादी बँक सध्याच्या बँकेपेक्षा कमी दराने कर्ज देत असेल, तर आपले कर्ज तिथे वर्ग (बॅलन्स ट्रान्सफर) करण्याचा विचार करा. यामुळे दीर्घकाळात व्याजाचा भार कमी होतो.
मोठे डाउन पेमेंट: घर खरेदी करताना सुरुवातीलाच 20 टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम स्वतःकडून भरा. कर्जाची मूळ रक्कम जेवढी कमी असेल, तेवढे व्याज तुम्हाला कमी द्यावे लागेल.
लक्षात ठेवा, फ्लोटिंग व्याजदरावर घेतलेल्या कर्जावर आगाऊ पैसे भरण्यासाठी कोणतीही पेनल्टी द्यावी लागत नाही. त्यामुळे हुशारीने नियोजन केल्यास तुम्ही तुमच्या हक्काच्या घराचे कर्ज खूप लवकर फेडू शकता.