कर्ज (Loan) त्याचवेळी घेतलं जातं, ज्यावेळी अत्यंत महत्त्वाचं काम असतं. नवीन व्यवसाय (Business) सुरू करण्यासाठी किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज घेणारेही अनेक लोक आहेत. मात्र, नंतर नोकरी गमावणं, व्यवसायात नुकसान किंवा आजारपणासारख्या परिस्थितीमुळे कर्जाचे हप्ते फेडण्यात अडचणी येवू शकतात. हप्ते चुकविल्यास, कर्जदारावरचं व्याज आणि दंड वाढतो. अशा स्थितीत लोक कर्ज सेटल करण्याचा पर्याय निवडतात. यामुळे काही काळ आराम मिळतो, पण नंतर त्याचे नकारात्मक परिणाम समोर येतात.
Table of contents [Show]
अर्थ मंत्रालयाचे निर्देश काय?
अर्थ मंत्रालयानं सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना 20 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्ज थकबाकीदारांकडून परस्पर संमतीनं एक-वेळ सेटलमेंट करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे लहान अडकलेल्या कर्जांचा निपटारा करता येईल. यापूर्वीही अनेक प्रकरणांमध्ये बँका कर्जदाराला त्यांच्या वतीने कर्जाची पूर्तता करण्याचा पर्याय देत आहेत. त्याचसोबत अनेक प्रकरणांमध्ये, कर्जदार स्वतः यासाठी बँकेकडे जातात आणि सेटलमेंटद्वारे दिलासा देण्याची मागणी करतात. दोन्ही प्रकरणांमध्ये, शेवटी कर्जदारालाच तोटा सहन करावा लागतो.
विचारलं जातं ईएमआय न भरण्याचं कारण
एखादी व्यक्ती जेव्हा 90 दिवसांपेक्षा जास्त म्हणजे 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ कर्जाचे हप्ते (EMI) भरत नाही, तेव्हा संबंधित बँका किंवा वित्तीय संस्था त्याला ईएमआय न भरण्याचं कारण विचारतात. बँका किंवा वित्त कंपन्या त्या व्यक्तीच्या दाव्याची बारकाईनं तपासणी करतात. त्या व्यक्तीकडे कर्जाची परतफेड करण्याची खरोखर क्षमता नाही, असं बँकेला किंवा वित्त संस्थेला वाटलं तर कर्ज सेटलमेंट ऑफर केली जाते.
कर्जदाराची क्षमता लक्षात घेता सेटलमेंट
एकवेळ कर्ज सेटलमेंटमध्ये, बँक किमान मूळ रक्कम एकाच पेमेंटमध्ये जमा करून खातं सेटल करण्याचा प्रयत्न करते. अशा परिस्थितीत बँका व्याज, दंड किंवा कायदेशीर खर्च माफ करतात. कर्जदाराची परतफेड करण्याची क्षमता आणि परिस्थिती लक्षात घेऊन सेटलमेंट रक्कम निश्चित केली जाते. सेटलमेंट रक्कम भरल्यानंतर, बँक एकूण थकबाकी रक्कम आणि सेटलमेंट रक्कम यांच्यातला फरक लिहून कर्ज बंद करतात.
क्रेडिट स्कोअरवर परिणाम
यामुळे दिलासा तर मिळतो, पण दीर्घकाळाचा विचार केल्यास त्याचे वाईट परिणामच समोर येतात. खरं तर अशा प्रकारे कर्ज बंद केल्यावर, कर्ज खात्याचं स्टेटस क्लोज्ड ऐवजी 'सेटल्ड' दाखवतं. कर्ज वेळेवर भरून कर्ज बंद केल्यावर कर्ज खात्याचं स्टेटस क्लोज्ड म्हणून दाखवलं जातं. वित्तीय संस्थांकडून ही माहिती क्रेडिट रेटिंग एजन्सीकडे जाते. सेटल्ड खातं हे साधारणपणे बंद केलेलं खातं नसतं, म्हणून ते निगेटिव्ह मानलं जातं. या सर्वाचा क्रेडिट स्कोअरवर वाईट परिणाम होतो आणि पुढील अनेक वर्षे तुम्हाला कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळवण्यात अनेक अडचणी येवू शकतात.
'या' काही पर्यायांचा वापर करावा
एकरकमी कर्ज सेटलमेंट हा शेवटचा उपाय असायला हवा. याशिवाय असे काही पर्याय आहेत, ज्याच्या मदतीनं तुम्ही कर्जाच्या या वेढ्यातून बाहेर पडू शकता. तुमच्याकडे काही बचत किंवा गुंतवणूक असेल तर संपूर्ण कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याचा वापर करावा. नातेवाईक किंवा मित्रांकडून व्याजमुक्त कर्ज घेऊन बँकेची थकबाकी भरण्याचा प्रयत्न करायला हवा. कर्जाच्या पुनर्गठनासाठी बँकेशी बोलणी करायला हवी. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण पैसे सहज परत करता येतील. एकरकमी सेटलमेंट करण्याऐवजी कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेकडे आणखी काही कालावधी मागावा.