साधारणत: घर विकत घेताना किंवा खरेदी करण्यासाठी कर्ज काढले जाते. पण जीवनात काही प्रसंग असेही येतात, त्यात राहतं घर गहाण ठेवावं लागतं. घर घेण्यासाठी गरजेनुसार विविध बॅंका आणि नॉन बॅंकिंग संस्थांची मदत घेतली जाते. पण मुंबई-पुण्यासारख्या शहरात राहत घर गहाण ठेवून कर्ज घेणारी मंडळी बरीच आहेत. असं घर गहाण ठेवून कोणत्या बॅंका कर्ज देतात? त्याचे नियम वेगळे असतात का? अशाप्रकारच्या कर्जासाठी व्याजदर काय आकारला जातो? अशी सर्व माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.
प्रत्येक जण समाजातील आपली प्रतिष्ठा आणि आर्थिक क्षमतेनुसार घर, गाडी व इतर तत्सम गोष्टींचा वापर करत असतो. पण काहीवेळेस अचानक अशी संकटं येतात की, त्यात राहतं घर गहाण ठेवून कर्ज घ्यावं लागतं. पण या कर्जाची परतफेड योग्य पद्धतीने आणि दिलेल्या मुदतीत झाली नाही तर बॅंकांच्या आणि वित्तीय संस्थ्यांच्या नियमानुसार गहाण (Mortgage) ठेवलेल्या घरावर जप्तीची कारवाई होऊ शकते. राहत्या घरावर जप्तीच्या कारवाईचा प्रसंग ओढावलेलं संपूर्ण कुटुंब मानसिकदृष्ट्या कोसळू शकतं. त्यातून चुकीच्या गोष्टी घडू शकतात. हे सर्व टाळण्यासाठी आणि राहतं घर गहाण ठेवताना काय काळजी घ्यायला पाहिजे हे समजून घेऊया.
राहत्या घरावर कसे कर्ज मिळते?
स्वत:च्या मालकीच्या घरावर सर्व राष्ट्रीयकृत बॅंका आणि वित्त संस्था कर्ज देतात. घर गहाण ठेवून कर्ज घेण्यासाठी घराची मूळ कागदपत्रं बॅंकेजवळ किंवा वित्तीय संस्थेकडे गहाण (Mortgage) ठेवावी लागतात. बॅंक घराची कागदपत्रे आणि अर्जदाराची कर्ज फेडण्याची क्षमता तपासून कर्ज मंजूर करते. कर्ज योग्य पद्धतीने आणि मुदतीत परतफेड केल्यास बॅंक घराची कागदपत्रे ठराविक कालावधीत अर्जदाराला परत करते. पण कर्जाचे हप्ते फेडण्यास दिरंगाई झाली किंवा ते दिलेल्या मुदतीत फेडले गेले नाही तर बॅंक अर्जदाराला नोटीस पाठवून किंवा दंडात्मक रक्कम भरून वाढीव मुदत देते. पण तरीही अर्जदाराकडून परतफेड झाली नाही तर, बॅंक घरावर जप्तीची कारवाई करू शकते.
घर गहाण ठेवताना या गोष्टी लक्षात घ्या
- पैसे उभारण्याचा सर्वांत शेवटचा उपाय म्हणून घर तारण ठेवण्याचा निर्णय घ्या.
- लहान-सहान अडचणींसाठी घर तारण ठेवण्याच्या निर्णय घेऊ नका.
- घर तारण ठेवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी नातेवाईक, जवळच्या मित्रांकडून मदत मागा.
- तारण ठेवलेल्या घराचे हप्ते (EMI) कसे आणि किती दिवसांत देणार, याचे नियोजन करा.
- कर्ज घेतल्यानंतर कर्जाचा हप्ता थकित राहणार नाही, याची अगोदरच तजविज करून ठेवा.
- कर्ज सहज मिळतंय म्हणून घर तारण ठेवू नका. निर्णय घेण्यापूर्वी वडिलधाऱ्या मंडळींचा किंवा आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
- उद्योजकांना घर तारण ठेवून धंद्यासाठी पैसे उभारण्याची सवय असते. पण उद्योजकानींही कर्जफेडीची आर्थिक गणित समजून घेऊनच कर्ज घेण्याचा निर्णय घ्यावा.
सहज उपलब्ध होत आहे म्हणून राहतं घर गहाण ठेवून कर्ज घेऊ नका. अत्यंत महत्त्वाच्या कारणासाठीच अडचणीच्या वेळी पैसे उभारण्याचा शेवटचा पर्याय म्हणून घरावर तारण कर्ज घ्या. कर्ज घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.