वस्तू आणि सेवा करातून मिळणाऱ्या महसुलात नोव्हेंबर 2022 या महिन्यात 11% वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात जीएसटीमधून सरकारला 1,45,867 कोटींचा महसूल प्राप्त झाला. (The Gross GST Revenue at 1,45,867 Crore) सलग नवव्या महिन्यात जीएसटीचा मासिक महसूल 1.40 लाख कोटींपार गेला आहे.यामुळे केंद्र सरकारला दिलासा मिळाला असून आर्थिक चणचण काही प्रमाणात दूर होणार आहे.
नुकताच केंद्र सरकारने नोव्हेंबर महिन्यातील जीएसटीची आकडेवारी जाहीर केली. यात नोव्हेंबर महिन्यात सरकारला जीएसटीतून 1,45,867 कोटी मिळाले. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सरकारला 1,31,526 कोटींचा महसूल मिळाला होता. 2022 या वर्षात सलग नऊ महिने प्राप्त होणारा जीएसटी महसूल 1.40 लाख कोटींवर आहे. ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये कर संकलनात घसरण झाली.ऑक्टोबर महिन्यात दसरा, दिवाळी सारखे मोठे फेस्टिव्हल होते. ज्यामुळे बाजारात प्रचंड खरेदी झाली होती.ऑक्टोबर महिन्यात जीएसटीमधून 1,51,718 कोटींचा महसूल मिळाला होता.
गेल्या महिन्यातील एकूण कर महसुलात 'सीजीएसटी'चा (CGST) वाटा 25,681 कोटी इतका होता. एसजीएसटीचा वाटा 32,651 कोटी आणि आयजीएसटीचा वाटा 77,103 कोटी इतका होता. नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना जीएसटीपोटी 17000 कोटींचा परतावा दिला.
कर बुडवणाऱ्यांविरोधात जीएसटी विभागाची विशेष मोहीम
कोव्हीड-19 मधून अर्थव्यवस्था पूर्णपणे सावरलेली असल्याचे जीएसटीच्या दरमहा महसुलातून स्पष्ट होत आहे. तसेच भारतातील कर विषयक नियमावली आणि प्रणाली दिवसागणीक कठोर होत आहे. कर चुकवेगिरीच्या पळावाटा रोखल्या जात आहेत. बनावट जीएसटी रॅकेट्सचा पर्दाफाश केला जात आहे. कर बुडवणाऱ्यांविरोधात जीएसटी विभाग विशेष मोहीम राबवत असतो. त्यामुळे जीएसटी कर प्रणालीत व्यावसायिकांची नोंदणी वाढत असल्याचे दिसून आले आहे. हे मुख्य कारण जीएसटी कर महसूल वाढण्यास कारणीभूत ठरले आहे.
येत्या 17 डिसेंबरला होणार जीएसटी कौन्सिलची बैठक
येत्या 17 डिसेंबर 2022 रोजी जीएसटी कौन्सिलची बैठक होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत कॅसिने, ऑनलाईन गेम आणि हॉर्स रेसिंग यावर जीएसटी लागू करण्याच्या प्रस्तावावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
GST Collection in the Year 2022
महिना | जीएसटी एकूण महसूल (कोटी रुपयांत) |
Mar | 142095 |
April | 167540 |
May | 140885 |
Jun | 144616 |
July | 148995 |
August | 143612 |
September | 147686 |
Oct | 151718 |
Nov | 145867 |