टोमॅटोच्या किंमती सध्या गगनाला भिडल्या आहेत. बाजारात टोमॅटोची आवक कमी आणि मागणी जस्त असल्यामुळे मुंबई-पुणेसह इतर शहरांमध्ये अजूनही टोमॅटो 150 ते 170 रुपये किलो दराने विकले जात आहेत. एवढेच नाही तर दिल्ली आणि एनसीआर परिसरात टोमॅटोचे भाव 250 किलो रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत. येत्या काही दिवसांत दिल्लीत टोमॅटोची आवक न वाढल्यास टोमॅटोचे भाव 300 रुपये किलोच्या पार पोहोचू शकतो असा अंदाज आहे.
टोमॅटोच्या भाववाढीने सामान्य जनता मात्र कमालीची त्रस्त आहे. सरकारने नाबार्ड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NCCF) च्या मदतीने अनुदानित टोमॅटो 70 रुपये किलो दराने विक्रीचा निर्णय घेतला असला तरीही सरकारलाच टोमॅटोचा साठा करताना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय.
नेपाळमधूनही टोमॅटो आयात करणार
केंद्र सरकार टोमॅटोच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी आता ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसते आहे. यासाठी नेपाळमधून टोमॅटोची आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याची माहिती खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. या आठवड्याच्या शेवटी नेपाळमधून टोमॅटोची पहिली खेप भारतात पोहोचेल असे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.
नेपाळमधून आयात केले जाणारे टोमॅटो कानपूर, लखनौ आणि वाराणसी शहरांमध्ये रवाना होतील अशीही माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे.
नवीन आवक का लांबली?
टोमॅटोची सर्वाधिक आवक ही हिमाचल प्रदेश, उत्तराखंड तसेच महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधून होत असते. मात्र मान्सूनचे आगमन झाल्यानंतर या राज्यांमधून आवक कमी झाली आणि नाशवंत माल असल्यामुळे पावसामुळे पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठा यात मोठी तफावत निर्माण झाली आहे. या कारणांमुळे टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. ऑक्टोबर पर्यंत नवी आवक बाजारात येईल असा अंदाज आहे. त्यांनतर टोमॅटोचे भाव पुन्हा खाली येतील असे बोलले जात आहे.