Gas Price Cut: घरगुती सिलिंडरची किंमत 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने आज (मंगळवार) कॅबिनेट बैठकीत घेतला. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या निर्णयाची माहिती दिली. गणेशोत्सव, दसरा, दिवाळी हे मोठे सण जवळ आले असताना भाजीपाला आणि विविध खाद्यपदार्थांच्या किंमती वाढत आहेत. महागाई वाढत असताना घरगुती गॅस 200 रुपयांनी स्वस्त करून सरकारने नागरिकांना सुखद धक्का दिला.
मागील अनेक दिवसांपासून घरगुती गॅसच्या किंमती कमी झाल्या नव्हत्या. विविध राज्यात 1,100 रुपयांच्या पुढे सिलिंडच्या किंमती गेल्या होत्या. कोट्यवधी ग्राहकांना सरकारच्या निर्णयाचा फायदा होईल. आघाडीच्या इंधन कंपन्यांकडून आता लवकरच दरकपात जाहीर करण्यात येईल. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत ट्विट केले आहे.
उज्ज्वला योजनेतील गॅसवरील सबसिडी वाढली
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमधील सिलिंडरवरील अनुदानही 200 रुपयांनी वाढवण्यात आले आहे. या योजनेतील सिलिंडरवर आधी 200 रुपये सबसिडी दिली जात होती. त्यात आणखी 200 रुपयांची वाढ केल्याने 400 रुपये एकूण सबसिडी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळेल.
उज्ज्वला योजनेंतर्गत 75 लाख नवे कनेक्शन
उज्ज्वला योजनेंतर्गत 75 लाख नवे मोफत कनेक्श देण्याची घोषणाही सरकारने केली. अतिरिक्त सबसिडीचा फायदा 33 कोटी ग्राहकांना होणार आहे. 2023-24 आर्थिक वर्षात अतिरिक्त सबसिडीमुळे 7,680 कोटींचा बोजा सरकारी तिजोरीवर पडेल, असे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले.
दिलासादायक दरकपात
मागील काही महिन्यांत LPG निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती खाल्या आल्या आहेत तरीही गॅसचे दर चढेच होते. घरगुती गॅसच्या किंमती राज्यानुसार वेगवेगळ्या असतात. सध्या दिल्लीमध्ये 14.2 किलो सिलिंडरची किंमत 1103 रुपये आहे. तर महाराष्ट्रामध्ये सिलिंडरची किंमत 1106 (HP Gas) रुपये आहे. घरगुती गॅसच्या किंमती मार्च महिन्यात 50 रुपयांनी वाढवण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता ही मोठी दरकपात आहे.
प्रधान मंत्री उज्ज्वला योजना केंद्र सरकारने 1 मे 2016 साली सुरू केली होती. या योजनेंतर्गंत 5 कोटी गॅस कनेक्शन देण्यात आले होते. दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी ही योजना आहे.