• 04 Oct, 2022 00:08

1 जुलैपासून सरकारी बचत योजनांच्या व्याजदरात वाढ होण्याची शक्यता!

1 जुलैपासून सरकारी बचत योजनांच्या व्याजदरात वाढ होण्याची शक्यता!

तुम्ही जर सरकारी बचत योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जाणून घ्या कोणत्या सरकारी योजनांवर किती व्याजदर आहे.

केंद्र सरकारच्या एनएससी (NSC), पीपीएफ (PPF), सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samridhi Yojna) यासारख्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण 1 जुलैपासून केंद्र सरकार पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी सारख्या बचत योजनांवरील व्याज दरात वाढ करण्याची शक्यता आहे.

सरकारी योजनांवरील व्याजदर 0.50 ते 0.75 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात

केंद्रीय अर्थ मंत्रालय प्रत्येक तिमाहीच्या सुरूवातीला सरकारी बचत योजनांवर दिल्या जाणाऱ्या व्याज दरांचा आढावा घेत असते. या आढाव्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार  1 जुलैपासून या बचत योजनांवरील व्याज दरात 0.50 ते 0.75 टक्क्यांपर्यंत व्याज वाढवण्याची घोषणा करू शकतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात पुन्हा एकदा 0.50 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे व्याजदर वाढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार बऱ्याच खासगी व सरकारी बॅंकांनी व्याज दरात वाढ केली. त्यामुळे सर्व प्रकारची कर्जे महागली तर मुदत ठेवींवरील व्याज दरात वाढ केली. आरबीआयने महिन्याभराच्या फरकाने रेपो दरात 90 बेसिस पॉईंटने वाढ केली. त्यामुळे आता केंद्र सराकर सरकारी बचत योजनांवरील व्याजदर 0.50 ते 0.75 टक्क्यांपर्यंत वाढ करू शकतं.

सरकारी योजनांवीरल व्याज दर 

सध्या पब्लिक प्रॉविडेंट फंड (PPF) वर वर्षाला 7.1 टक्के व्याजदर मिळतो. नॅशनल सेविंग सर्टिफिकेट (NSC) वर वार्षिक 6.8 टक्के व्याज मिळतं. तर सुकन्या समृद्धी योजनेवर (SSY) 7.6 टक्के व्याज मिळत आहे. सिनिअर सिटिजन सेव्हिंग स्कीमवर (SCSS) 7.4 टक्के आणि किसान विकास पत्र (KVP) वर 6.9 टक्के व्याज मिळत आहे.

केंद्र सरकारच्या या बचत योजानांवरील व्याजदरात गेल्या वर्षभरात कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान, आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यामुळे आता सरकार या योजनांवरील व्याजदरात 1 जुलैपासून वाढ करण्याची शक्यता आहे.